Latur news – बैलं धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू, गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना

बैलं धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मौजे माळहिप्पगा येथे मंगळवारी ही घटना घडली. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळहिप्परगा येथील शेतकरी श्रीपति बाबुराव पवार (वय – 42) आणि त्यांचा मुलगा नामदेव (वय – 12) हे दोघेही बैलं धुण्यासाठी गावाजवळील पाझर तलावावर गेले होते. बैलं धुवून बाहेर निघताना सैरभैर झालेली बैलजोडी खोल पाण्याकडे जावू लागल्याने नामदेवने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

बैल जोडीला बाहेर काढताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने नामदेव बुडू लागला. हे पाहताच नामदेवचे वडील श्रीपती यांनीही तिकडे धाव घेतली आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाझर तलावातील गाळामध्ये दोघेही अडकले आणि दोघांचाही मृत्यू झाला.

आसपासच्या शेतकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना जमा केले. पट्टीच्या पोहणाऱ्या गावकऱ्यांनी तलावात उडी घेत बाप-लेकाला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. पवार बाप-लेकाचे मृतदेह जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर माळहिप्परगा येथे दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.