बुमराहची नाही तर, ट्रेविस हेड आणि उस्मान ख्वाजाला वाटत आहे ‘या’ गोलंदाजाची भीती

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 22 नोव्हेंबर पासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर ट्रेविस हेडने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये टीम इंडियाच्या एका गोलंदाजाचे नाव सांगितले आहे. त्या गोलंदाजाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक आणि मजेशीर असते असे त्याने म्हटले आहे.

जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील एक नंबरचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या गोलंदाजीविरुद्ध खेळताना फलंदाजांची तारांबळ उडताना तुम्ही सुद्धा पाहिली असेल. असे असताना ट्रेविस हेडने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये जसप्रीत बुमराहचे नाव न घेता टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर उस्मान ख्वाजाने सुद्धा अश्विनविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असल्याचे म्हटल आहे. तो म्हणाला की, अश्विनविरुद्ध खेळायला मला जास्त आवडतं. अश्विन नेहमीच एक चांगला ऑफस्पिनर राहिला आहे. त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे आव्हानात्मक असते आणि पूर्ण एकाग्रतेने फलंदाजी करावी लागते. विशेष म्हणजे तो सामन्यात तुमच्या पुढचा विचार करतो आणि ते मला जास्त आवडतं, असं उस्मान ख्वाजा म्हणाला.

ट्रेव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने सुद्धा अश्विनचे कौतुक करत तो एक महान ऑफस्पिनर असल्याचे म्हटल आहे. त्याचबरोबर त्याची गोलंदाजी बघून मी खूप काही शिकलो आहे. असं सुद्धा तो नॅथन म्हणाला आहे.