राज्यात राबविल्या जात असलेल्या शिक्षकभरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना आता आणखीन एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास 3 वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱया उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांना शिक्षकभारतीने निवेदन देऊन परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती ‘शिक्षक भारती’चे नेते सुनील गाडगे यांनी दिली.
तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून, शिक्षणसेवकांना या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे. ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून राज्यात नुकतीच शिक्षकभरती पार पडली. यात 14 हजार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षांसाठी नेमणूक देण्यात आली आहे. आणखी 5 हजार उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याआधी तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱया उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे. आता मात्र तीन वर्षांनंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही. तर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना नोकरीत कायम केले जाणार आहे. अन्यथा या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.
वरील परिपत्रक रद्द करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा शिक्षकनेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, आशा मगर, सोमनाथ बोंतले, बाबासाहेब लोंढे, विजय कराळे, मोहम्मद समी शेख, रामराव काळे, महेश पाडेकर, किशोर डोंगरे यांच्यासह पदाधिकाऱयांनी दिला आहे.
शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यालाही विरोध
n इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गामध्ये विद्यार्थी मोठय़ा संख्येने प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन आग्रही आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. याला ‘शिक्षक भारती’चा कडाडून विरोध आहे.