नगर जिल्हा परिषद. मध्ये मध्यरात्रीपर्यंत बदलीप्रक्रिया, 234 शिक्षकांची बदली

गुरुजींची जिह्यांतर्गत बदलीप्रक्रिया शनिवारी मध्यरात्रीपर्यंत जिल्हा परिषदेत सुरू होती. त्यात तब्बल 234 शिक्षकांच्या समुपदेशनाने बदली करण्यात आल्या. त्यात शिक्षकांच्या 135, पदवीधरांच्या 79 व मुख्याध्यापकांच्या 21 बदल्यांचा समावेश आहे. ही बदलीप्रक्रिया सकाळी दहापासून मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.

या पारदर्शी प्रक्रियेमुळे गुरुजींनी समाधान व्यक्त केले. या बदलीप्रक्रियेसाठी शिक्षक आक्रमक झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी आठवडय़ात बदलीप्रक्रिया राबविण्याचे दिलेले आश्वासन पाळले. बदल्यांसाठी ग्रामविकास विभाग मंत्रालयाच्या 11 मार्च 2024च्या पत्राचा आधार घेण्यात आला. त्यानुसार ही बदलीप्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, सोईनुसार बदल्या झाल्याने गुरुजींनी समाधान व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल शेळके व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी शासननिर्णयातील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांच्या जिह्यांतर्गत बदलीची कार्यवाही केली.

बदलीसाठी इच्छुक प्राधान्यक्रमानुसार एकूण 4 हजार 17 अर्ज दाखल झाले होते. त्यात बदलीसाठी 2 हजार 605 इच्छुकांचे प्राधान्यक्रम व ज्येष्ठतेनुसार पात्र अर्ज विचारात घेण्यात आले. शनिवारी समुपदेशन प्रक्रियेद्वारे जिह्यांतर्गत बदलीसाठी प्रत्येक पात्र शिक्षकांना शाळा निवडण्याची संधी देण्यात आली. या बदली प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या 135, पदवीधर शिक्षकांच्या 79 व मुख्याध्यापकांच्या 21, अशा एकूण 234 शिक्षकांच्या जिह्यांतर्गत विनंती बदल्या झाल्या. यासाठी उपशिक्षणाधिकारी शिवगुंडे, कक्ष अधिकारी संभाजी भदगले, विस्तार अधिकारी विलास साठे, अधीक्षक छाईलकर, योगेश गवांदे, योगेश पंधारे, सुनील पवार, तमनर, फसले, सदावर्ते, सुरडे, चोभे, श्रीमती ससाणे यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचाऱयाचे सहकार्य लाभले.

मुदतीत बदलीप्रक्रिया राबवली जाईल, हे अशक्य वाटत होते. सीईओंनी शब्द पाळला. शासननिर्णयामुळे द्विशिक्षकी शाळांच्या रिक्त जागा खुल्या करता आल्या नाहीत, त्याचे खापर प्रशासनावर फोडणे योग्य नाही.

– शरद वांढेकर, जिल्हाध्यक्ष, अखिल महा. प्रा. शिक्षक संघ.