इंडिया आघाडीतील काँगेस नेते तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘संविधान बचाव’चे वातावरण तयार केले आहे. त्याची धास्ती भाजप आणि मित्रपक्षांनी घेतली आहे. त्यामुळे काही वाचाळवीर खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांच्या विरोधात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करीत आहेत. त्याचा जाहीर निषेध करत असून, येत्या निवडणुकीत जनताच महायुतीला याचे उत्तर देईल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शिवसेना मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. आमदार सतेज पाटील यांनीही समाचार घेत भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालली असून, वाचाळवीरांच्या वक्तव्याला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो; पण ती काँगेसची संस्कृती नाही, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.
धमकीमुळे आवाज बंद होणार नाही – बाळासाहेब थोरात
महात्मा गांधी यांच्या मारेकऱयांची आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱयाची वृत्ती एकच आहे, असा हल्लाबोल करीत विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून म्हटले आहे.
राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणात नाही, काँग्रेसचे कोटय़वधी कार्यकर्ते राहुल गांधींची ढाल आहेत, असे सांगत संजय गायकवाडच्या मुसक्या आवळून, राज्य सरकारने अशा विषवल्लीला मुळापासून उखडून फेकले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांना सत्तेचा माज – शिवराज मोरे
मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. विरोधकांना सत्तेची मस्ती असून, गायकवाड यांनी माफी मागितली नाही तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवराज मोरे यांनी दिला आहे. संजय गायकवाड यांनी आपली लायकी समजून वक्तव्य करावे; अन्यथा युवक काँग्रेसकडून त्यांना धडा शिकवण्यात येईल, असेही शिवराज मोरे म्हणाले.
गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा – पृथ्वीराज चव्हाण
मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर 351 कलमाप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलमाखाली 283 ते 287 नुसार समरी ट्रायलप्रमाणे खटला चालवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.