मुंबई गुन्हे शाखेची बदलापुरात कारवाई, एमडी बनविणारा कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने बदलापूर येथे धडक कारवाई केली. बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी येथे एक कारखाना थाटून तेथे एमडी बनविण्याचा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी चार ड्रग्जमाफियांना अटक करून तो कारखाना उद्ध्वस्त केला. आरोपींपैकी एकाने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतलेले असून तो एका कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरचे काम करत होता.

अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने गस्तीवेळी 11 तारखेला मानखुर्द परिसरात एमडी विकणाऱ्या दोघा तस्करांना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या ताब्यात 106 ग्रॅम एमडी सापडला होता. दोघांच्या चौकशीत तिसऱ्याचे नाव समोर आल्यानंतर त्यालाही शोधून पकडण्यात आले. तिसऱ्या आरोपीकडे कसून चौकशी केल्यावर बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी येथे एमडी बनविण्याचा कारखाना थाटलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने त्या कारखान्यावर धडक देऊन 206 किलो वजनाचे विविध केमिकल व एक किलो 580 ग्रॅम वजनाची एमडीसदृश सफेद पावडर मिळून आली. दरम्यान, कारखान्यात ज्याच्या मार्गदर्शनाखाली एमडी बनविले जाते त्या चौथ्या आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या चौथ्या आरोपीलादेखील बेड्या ठोकल्या.