पुणे पुन्हा हादरले, कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार

शहरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असतानाच, कोंढवा परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. वाळू सप्लायर व्यावसायिकावर गोळीबार केल्याच्या घटनेने कोंढवा परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, मागील काही दिवसांत हत्या, मारामारी, कोयता गँगचे हल्ले, गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकाच महिन्यात गोळीबाराची तिसरी घटना घडली असून, पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसून आले आहे.

कोंढवा परिसरात सोमवारी भरदिवसा वाळू सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकावर अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या. दिलीप गायकवाड असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या आहेत. हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वारंवार गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. येरवड्यात काही दिवसांपूर्वी हॉटेल चालकावर गोळीबार करण्यात आला होता तर वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर 16 सप्टेंबरला टोळक्याने वाळू व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना कोंढव्यात घडली आहे.

आम्ही कोणाला सोडत नाही, ठोकून काढतो – फडणवीस

कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तत्काळ शोधून काढतो, ठोकून काढतो, जेलमध्ये टाकतो. त्यामुळे पुणे सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांत सलग गोळीबार, कोयत्याने वार, गटांमध्ये वाद होऊन मृत्यू, अशा घटनांमुळे पुणे शहर हादरले असल्याबद्दल फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी हे स्पष्ट केले.