कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड; आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा गंभीर आरोप

कोलकात्यातील रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा गंभीर आरोप आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी हा आरोप केला. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठकीला तयार आहोत; परंतु या बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी केली होती. मात्र, आता बैठकीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याची मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे. दरम्यान, ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण आरोग्य विभागातील अधिकारी आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील मिलीभगतचा परिणाम असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला.

डॉक्टरांनी आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी घटनास्थळावरील पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. या प्रकरणात ताला पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरही डॉक्टरांनी गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टर आंदोलकांना बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. त्यानुसार डॉक्टर पोहोचलेही. मात्र, यावेळी आंदोलकांनी बैठकीच्या थेट प्रक्षेपणाऐवजी व्हिडीओ चित्रीकरण करण्याची मागणी केली.

घोष यांची पॉलिग्राफ चाचणीत दिशाभूल

आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे आढळून आले आहे. संदीप घोष यांची पॉलिग्राफ चाचणी आणि आवाजाचे विश्लेषण करण्यात आले आहे. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालात घोष यांच्या विधानांची तपासणी केली असता त्यांची विधाने दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आले. दरम्यान, पॉलिग्राफ चाचणीत समोर आलेली माहिती पुरावा म्हणून सादर करता येत नाही. तपास यंत्रणा पॉलिग्राफ चाचणीच्या आधारे पुरावे गोळा करू शकतात.