चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानची अंतिम फेरीत धडक

गतविजेत्या हिंदुस्थानने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत कारकिर्दीत सहाव्यांदा आशियाई अजिंक्यपद करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. हिंदुस्थानने उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाचा 4-1 गोलफरकाने धुव्वा उडवत स्पर्धेत विजयाचा षटकारही ठोकला. पहिल्या उपांत्य लढतीत यजमान चीनने पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का दिला. आता उद्या (दि. 17) हिंदुस्थान-चीन यांच्यात विजेतेपदाची लढत रंगणार आहे.

हिंदुस्थानच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करीत मोलाचा वाटा उचलला. याचबरोबर उत्तम सिंह व जरमनप्रीत  यांनीही 1-1 गोल केला. दक्षिण कोरियाकडून यंग जी हुन याने आपल्या संघासाठी एकमेव गोल केला. जबरदस्त मैदानी गोल करणारा हरमनप्रीत या सामन्याचा मानकरी ठरला.

मैदानावर उतरताच हिंदुस्थानने आपल्या आक्रमक शैलीत खेळाचा प्रारंभ केला. मात्र, चौथ्या व पाचव्या मिनिटाला हिंदुस्थानी खेळाडूंनी गोलची संधी दवडली. मग स्टार खेळाडू उत्तम सिंगने 13व्या मिनिटाला आरईजीत सिंह हुंदलच्या पासवर कोरियाच्या संरक्षण फळीला भेदत अप्रतिम गोल करत हिंदुस्थानचे खाते उघडले. दक्षिण कोरियालाही दोन पेनल्टी का@र्नर मिळाले होते, पण त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सरपंच नावाने प्रसिद्ध असलेल्या हरमनप्रीतने 19व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर वेगवान गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी वाढविली.

मध्यंतरानंतर लढतीचा थरार आणखी वाढला. या तिसऱ्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानचा स्टार खेळाडू जर्मनप्रीत सिंगने 32 व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करत हिंदुस्थानच्या आघाडीला 3-0 अशी बळकटी आणली. त्याने एकट्यानेच चेंडू पुढे नेत डीच्या बाहेरून जबरदस्त फटका मारत भन्नाट गोल केला. पुढच्याच मिनिटाला कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर यांग जी हुनने गोल करीत कोरियासाठी गोल अंतर 1-3 असे कमी केले. 45व्या मिनिटाला कोरियाच्या गोलरक्षकाला येलो कार्ड देण्यात आले आणि हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मग कर्णधार हरमनप्रीत सिंगने यावर सुरेख गोल करत हिंदुस्थानला 4-1 अशी मोठी आघाडी मिळवून दिली. चौथ्या क्वार्टरमध्ये हुरूप वाढलेल्या हिंदुस्थानने योग्य समन्वय राखत खेळ केल्याने त्यांना गोल करण्याच्या चार संधी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, कोरियन गोलरक्षकाने हिंदुस्थानी खेळाडूंना आणखी गोल करू न देता आपल्या संघाची मानहानी टाळली.

चीनकडून पाकिस्तान शूट‘आऊट’

यजमान चीनने शूटआऊटपर्यंत ताणलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत  पाकिस्तानचा 2-0 गोलफरकाने पराभव करीत आशियाई हॉकी अजिंक्यपद करंडक स्पर्धेची फायनल गाठून इतिहास घडविला. युआनलिन लू याने 18व्या मिनिटाला गोल करीत चीनला 1-0 असे आघाडीवर नेले. त्यानंतर अहमद नदीमने 37व्या मिनिटाला गोल करीत पाकिस्तानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत ही बरोबरीची कोंडी फुटू न शकल्याने लढत शूटआऊटमध्ये गेली. या मोक्याच्या वेळी चीनचा गोलरक्षक वैयू वांग गोलपोस्टपुढे चिनी भिंतीप्रमाणे उभा राहिला. बेनहाई चेन व चानलियांग लिन यांनी गोल करीत चीनला 2-0ने विजय मिळवून दिला. स्पर्धेच्या इतिहासात चीनने प्रथमच फायनलमध्ये धडक दिली हे विशेष.