आंदोलनांच्या दणक्याने मिंधे सरकार हादरले, गिरणी कामगारांच्या घरांसाठी दीड हजार कोटी

घरांच्या मागणीसाठी गिरणी कामगारांच्या संघटनांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत; मात्र त्याची दखल मिंधे सरकारकडून घेतली जात नाही. त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांमध्ये सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो याची जाणीव झाल्याने मिंधे सरकारने आज गिरणी कामगारांच्या घरांसाठी दीड हजार कोटी रुपये देण्यास मान्यता दिली.

एक लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित झाली आहे. त्यांच्यासाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात 300 चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिंधे सरकारने दिले होते; परंतु अद्याप त्या दिशेने काहीच हालचाली होत नसल्याचे दिसून आल्याने गिरणी कामगारांच्या संघटनांनी उपोषण व अन्य मार्गाने आंदोलने सुरू केली आहेत. अखेर सरकारने मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेला महाराष्ट्र निवारा निधीतून दीड हजार कोटी रुपये निधी देण्यास मान्यता दिली. तसा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

गिरणी कामगारांना प्रत्येकी साडेनऊ लाखांमध्ये घर दिले जाणार आहे. सरकारकडून प्रत्येक घरासाठी साडेपाच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा तो खर्च मुंबई महानगरपालिका, गृहनिर्माण विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र निवारा निधी आणि अर्थसंकल्पीय तरतूद असा समप्रमाणात विभागला जाणार आहे. त्यातील महाराष्ट्र निवारा निधीतील दीड हजार कोटी रुपये देण्यास आज मान्यता दिली गेली आहे.

कामगारांना मुंबईबाहेर काढण्याचा डाव

मिंधे सरकारचा हा निर्णय गिरणी कामगारांच्या संघटनांना मात्र रुचलेला नाही. संयुक्त मराठी चळवळीच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगार आणि वारसांनी अलीकडेच वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत आणि उपनेते सचिन अहिर यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना आवाज उठवेल असा विश्वास दिला; परंतु राज्य सरकारचा पुणीही प्रतिनिधी आम्हाला भेटला नाही. दीड हजार कोटी रुपये घरांसाठी दिले म्हणताहेत; पण ती घरे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात म्हणजेच मुंबईबाहेर असतील आणि मुंबईतच घरे मिळावी अशी कामगारांची मागणी आहे, असे संयुक्त मराठी चळवळीचे हेमंत गोसावी यांनी सांगितले. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून कामगारांना एकही घर दिलेले नाही आणि 1 लाख कामगारांना घरे दिल्याचे बोर्ड सर्वत्र लावत आहे, त्याच्या निषेधार्थ गिरणी कामगार गणेशोत्सवानंतर आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.