मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू, महाराष्ट्रात दंगली झाल्या तर फडणवीस, भुजबळ जबाबदार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात दंगली झाल्यास फडणवीस आणि भुजबळ हेच जबाबदार असतील असेही ते म्हणाले.

सरसकट मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राचे वाटप, सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी मागण्यांसाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. सरकारने या मागण्या मान्य करून तातडीने त्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे उपोषण असल्याचे जरांगे म्हणाले.

राजकारणावर बोलणार नाही

निवडणूक, राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा मी राजकारणावर ब्र शब्दही बोलणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले.

भाजपमधील मराठेही बाहेर पडतील

मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच अडथळा आणला आहे. भाजपमधील काही माकडेही अधूनमधून उड्या मारत असतात. आमचे आंदोलन फक्त आरक्षणासाठी आहे. आरक्षण दिले नाही तर भाजपमधूनही मराठे बाहेर पडतील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत

छगन भुजबळ हे बुद्धीभेद करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. धनगर समाजाच्या एसटीतून आरक्षणाला आम्ही विरोध केलेला नाही. मात्र भुजबळ त्यावरून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कळ लावणे थांबवावे नसता हे सगळे महागात पडेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.