जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया झाली एकदम सोपी , एका क्लिकमध्ये ई-केवायसी

दूरसंचार विभागाने एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, वोडापह्न आयडिया ग्राहकांची सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया एकदम सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या नियमांमुळे आता सिमकार्ड खरेदी करण्यासाठी किंवा ऑपरेटर बदलण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल बनली आहे. आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन व्हेरिफाय करता येतील. यामुळे पेपरलेस कारभाराला प्रोत्साहन तर मिळेल तसेच युसर्जची ओळख सुरक्षित राहील.

एलआयसी ग्राहकांना मिळणार डिजिटल सुविधा, इन्फोसिससोबत केली हातमिळवणी

देशातील सर्वात मोठी भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीने आता डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यासाठी कंपनीने देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्पहसिससोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता एलआयसीच्या ग्राहकांनाही बँकांच्या डिजिटल सेवांप्रमाणे सेवा मिळू शकणार आहेत.

आतापर्यंत एलआयसीच्या ग्राहकांना विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी होम ब्रँचमध्ये जावे लागायचे. याउलट बँकेचे ग्राहक देशातील कोणत्याही शाखेत जाऊन विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. यासाठी होम ब्रँचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. एलआयसीने डाईव्ह अर्थात डिजिटल इनोव्हेशन अँड व्हॅल्यू एन्हांसमेंट नावाचा डिजिटल परिवर्तन कार्यक्रम सुरू केला आहे. एलआयसीने डाईव्ह प्लॅटफॉर्म वापरून आपल्या ग्राहकाना फील्ड पर्ह्सेस, भागीदारांना आणि कर्मचाऱयांना नवीन अनुभव देण्याची योजना आखली आहे.

कोरियोग्राफरवर बलात्काराचा गुन्हा

राष्ट्रीय पुरस्कार विजेता कोरियोग्राफर जानी मास्टर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराची तक्रार करणारी 21 वर्षीय तरुणी हीदेखील कोरिओग्राफर आहे. जानीने अनेक महिन्यांपासून कधी सेटवर तर कधी घरात तिचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे. सुरुवातीला रायदुर्गम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नरसिंगी पोलीस ठाण्यामध्ये प्रकरण पाठवण्यात आले. महिला कोरिओग्राफरने केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जानीने सिनेमाच्या सेटवर आणि आऊटडोर शूटिंगच्या वेळी तिचा विनयभंग केला.

जेलमध्ये अभिनेता दर्शनाचा थाट

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन हा त्याचा चाहता रेणुकास्वामीचे अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली सध्या गजाआड आहे. अशातच शनिवारी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहाच्या एका बराकमध्ये 1.3 लाख रुपये किंमतीच्या सॅमसंग डिव्हाईससह 15 मोबाईल, सात इलेक्ट्रिक मड स्टोव्ह, पाच चाकू, तीन मोबाईल चार्जर, दोन पेन ड्राईव्ह, 36 हजार रुपये रोख, सिगारेट आणि बिडीची पाकिटे, माचिस बॉक्स जप्त केले. खुनाचा आरोप असलेला दर्शनचा तुरुंगात गँगस्टर विल्सन गार्डन नागासोबतचा पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पाच दिवस मोफत बघा नाटकं

यंदा 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान नाटक महोत्सव नेहरू सेंटरच्या नाटय़गृहात होणार आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजत नाटकांचा मुंबईकरांना विनामूल्य आनंद घेता येईल. यंदा महोत्सवाचे 26 वे वर्ष आहे. यावेळी मराठीबरोबर गुजराती, हिंदी नाटकांचा सुद्धा समावेश आहे. 23 सप्टेंबरला स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ 24 सप्टेंबरला ‘आषाढ का एक दिन’ हे हिंदी नाटक सादर करण्यात येणार आहे. 25 सप्टेंबरला ‘एकेक पान गळावया’ तर 26 सप्टेंबरला गुजराती व्यावसायिक रंगमंचावर गाजलेले ‘हुं स्पेशल छुं’ नाटक सादर केले जाणार आहे.