पुरे झाले वर्क फ्रॉम होम… आता ऑफिसला या!

देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रो लिमिटेडने वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करणाऱया कर्मचाऱयांना ऑफिसमध्ये बोलावण्याचे कडक धोरण लागू केले आहे. त्यानुसार आता विप्रोच्या कर्मचाऱयांना आठवडय़ातून किमान तीन दिवस ऑफिसमध्ये येणे बंधनकारक असेल अन्यथा त्यांची एक दिवसाची सुट्टी कापली जाईल.

कोरोना प्रभाव कमी झाल्यापासून जगभरातील कंपन्यांनी आता घरातून काम करण्याची पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांसाठी कार्यालयात परतण्याचा आदेश जारी केला आहे. यासंदर्भात विप्रोने कर्मचाऱयांना 2 सप्टेंबर रोजी ई-मेल पाठवले आहेत. व्यवस्थापनाने एचआर टीमला सूचना दिल्यात की कर्मचाऱयांची वर्क फ्रॉम होम सुविधा रद्द करावी.

 विप्रो व्यवस्थापनाने एचआर टीमला कर्मचाऱयांची वर्क फ्रॉम होम विनंती नाकारण्याचे आदेश दिले आहेत. आदेशात म्हटले आहे की, ‘अशा प्रकारची कोणतीही मान्यता मिळाल्यास कृपया ती मंजुरी तत्काळ रद्द करा आणि टीमला आठवडय़ातून किमान तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगा. असे न केल्यास सिस्टीममधील रजा कापून घ्यावी. जर एखादा कर्मचारी आठवडय़ातून आवश्यक तीन दिवस कार्यालयात उपस्थित नसेल, तर सर्व तीन दिवस सुट्टी म्हणून गणले जातील.’