संपत्तीवरून कल्याणींच्या घरात कलह वाढला, आईच्या मृत्युपत्रावरून न्यायालयात लढाई

संपत्तीवरून कल्याणींच्या घरात कलह वाढला असून भारत फोर्ज कंपनीच्या मालमत्ता वाटपाचे आणखी एक प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहोचले आहे. भारत पर्ह्ज समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी आणि बहिणीत मालमत्तेवरून न्यायालयीन लढाई सुरू आहे तर आता बाबा कल्याणी आणि त्यांचा धाकटा भाऊ गौरीशंकर कल्याणी यांच्यात दिवंगत आई सुलोचना यांच्या मृत्युपत्रावरून नवा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

बाबा कल्याणी यांनी 27 जानेवारी 2012 चे मृत्युपत्र न्यायालयाकडून प्रमाणित करून घेण्यासाठी पुणे दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर गौरीशंकर यांनी त्याला विरोध करत 17 डिसेंबर 2022 रोजी दुसरे मृत्युपत्र सादर केले. मालमत्तेच्या वितरणाबाबत वेगवेगळ्या मृत्युपत्रात वेगवेगळ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. ज्यात कल्याणी समूहाच्या मालमत्ता आणि शेअर्सचा समावेश असून आता या प्रकरणी पुढील महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हिरेमठ कुटुंबाने हिंदू अविभक्त कुटुंब कायद्यानुसार कल्याणी कुटुंबाच्या मालमत्तेत नववा हिस्सा मिळावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

आईच्या मृत्युपत्राचा वाद नेमका काय?

गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये सुलोचना कल्याणी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मागे कोटय़वधी रुपयांची संपत्ती सोडून त्या गेल्या. 2012 च्या मृत्युपत्रात सुलोचना यांची संपत्ती मुलांना म्हणजेच बाबा, गौरीशंकर आणि सुगंधा यांना देण्यात आली होती. मात्र, यामध्ये सर्वांना समान वाटा देण्यात आलेला नाही.

बाबा कल्याणी यांना मोठा हिस्सा

कल्याणी समूहाच्या कंपन्यांमध्ये आईच्या शेअर्सचा मोठा हिस्सा बाबांना वारसाहक्काने मिळाला. यात भारत पर्ह्ज आणि कल्याणी हिंदू अविभक्त कायद्यांतर्गत जंगम मालमत्ता आणि दागिन्यांचा समावेश आहे. तर गौरीशंकर आणि सुगंधा यांना काही मालमत्ता, दागिने आणि इतर मालमत्ता देण्यात आल्या आहेत. हायकल या देशातील आघाडीच्या विशेष रसायन कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीच्या सुगंधा या संचालक आहेत.

भावांमध्ये काय वाद?

सुलोचना यांनी मागील सर्व इच्छापत्र रद्द केले होते आणि मालमत्ता गौरीशंकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हस्तांतरीत केली होती, असा दावा गौरीशंकर यांनी न्यायालयात केला आहे. बाबांनी मालमत्तेतील हिस्सा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही गौरीशंकर यांनी केला आहे. मात्र, बाबांच्या प्रवक्त्याने गौरीशंकर यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.