माझ्या कार्यक्रमात गोंधळ घातला तर काँग्रेसच्या कुत्र्यांना तिथेच गाडून टाकीन, संजय गायकडवाड पुन्हा बरळले

मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपये देणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते भडकले असून संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

तसेच येत्या 19 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा दौऱ्यावर येणार असून तिथे त्यांच्या हस्ते एका स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखणार असल्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

काँग्रेसच्या या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. ” माझ्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कुत्र्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकू’, अशी धमकीच संजय गायकवाड यांनी दिली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. -जो कुणी राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला मी 11 लाख रुपये देईन, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वादाला तोंड फोडलं आहे. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.