संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसचा पोलीस ठाण्यात बैठा सत्याग्रह

राहुल गांधी यांची जीभ छाटणार्‍याला अकरा लाखांचे बक्षीस देण्याचे वक्तव्य करणार्‍या मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत काँग्रेसने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून उठणार नसल्याची भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या राहुल गांधी यांची जीभ कापून आणणार्‍यास अकरा लाखाची बक्षीस देण्याच्या विधानावरून बुलढाणा जिल्ह्यात राजकारण पेटलं आहे. राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. आमदार गायकवाड यांना युएपी अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावे, अशी मागणी काँग्रेसकडून उठत आहे. राहुल गांधींच्या जिभेपर्यंत काय त्यांच्या पायाच्या नखापर्यंत ही गायकवाडांचे हात पोहोचू शकत नाहीत! असे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव जयश्री शेळके यांनी म्हटले असून त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचा धिक्कार केला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही असल्याचे आमदार गायकवाड यांनी स्वतःच बेताल वक्तव्यातून दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी दिली. दरम्यान काँग्रेसपक्षाने वज्रमुठ आवळली असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात बैठे आंदोलन सुरू करून आमदारांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तसेच आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी केली.

माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांचे बेताल वक्तव्याचा निषेध करीत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सामना शी बोलताना सांगितले. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये ठीय्या मांडून बसलेल्या मध्ये राहुल बोंद्रे, जयश्री शेळके, हर्षवर्धन सपकाळ, दिलीप सानंदा, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, संजय राठोड, प्रकाश पाटील अवचार, मिलन आंबेकर व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते