टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये 19 सप्टेंबर पासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जैसवालला इतिहास रचण्याची संधी आहे.
यशस्वी जैसवालने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून 1028 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन खणखणती शतकांचा सुद्धा समावेश आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत 712 धावा करत त्याने सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. तसेच त्याने एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 26 षटकार खेचले आहेत. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम न्युझीलंडचा स्टार फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावार आहे. त्याने 2014 साली एकाच वर्षात कसोट क्रिकेटमध्ये 33 षटकार खेचले होते.
यशस्वी जैसवालला ब्रेंडन मॅक्युलमचा हा विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत 8 षटकार ठोकले तर, यशस्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणार फलंदाज ठरू शकतो. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार खेचण्याच्या यादीत ब्रेंडन मॅक्युलम 33 षटकार (2014) पहिल्या स्थानावर, यशस्वी जैसवाल 26 षटकार ठोकत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तसेच बेन स्टोक्स 26 षटकार (2022), अॅडम गिलक्रीस्ट 22 षटकार (2005) आणि विरेंद्र सेंहवाग 22 षटकार (2008) यांचा समावेश आहे.