माझ्या साहेबांना पैशाने ओवाळता काय? तुमच्यासारखे 50 मुख्यमंत्री त्यांच्यावरून आम्ही ओवाळून टाकू!

आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश एक आदर्श वस्तुपाठ म्हणून पाहात होता. लाखो शिवसैनिकांचे मंदिर असलेल्या याच आनंदाश्रमात ढोलताशे बडवत नोटा उडवण्यात आल्या. मिंधेंच्या या हिडीस प्रकारामुळे तळपायाची आग मस्तकाला भिडली. त्यांच्या या मनोवृत्तीचं प्रदर्शन साऱ्या देशाने बघितलं. माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळता काय? अरे.. तुमच्यासारखे असे 50 मुख्यमंत्री त्यांच्यावरून ओवाळून टाकू. आता माफीबिफी जाऊ द्या, ठाणेकर जनताच या गद्दारांना जन्माची अद्दल घडवेल, अशा शब्दांत आनंद दिघे यांची पत्रे लिहिणारे नंदकुमार गोरुले यांनी मिंधेंच्या पंटरांना अक्षरशः फोडून काढले.

तुम्ही देशाचे नेते झालात का?

प्रसारमाध्यमांशी बोलताना गोरुले यांनी मिंर्धेचे पदाधिकारी नरेश म्हस्के यांच्यावरही टीकेची झोड उठवली. तुम्ही काय होता हो? जॅकेट, कोट घातले म्हणजे देशाचे नेते झाला आहात का, असा सवाल करत ते म्हणाले, आज तुम्ही ठाणे शहराला बदनाम केले. माझे दिघेसाहेब अहोरात्र तुमच्यासाठी लढले. त्यांच्या नावाचा दरारा होता म्हणून तुम्ही रस्त्यावर ताठ मानेने फिरू शकत होतात हे विसरू नका, असेही बजावले.

त्यांना जागा दाखवा!

आनंदाश्रमात आनंद दिघे यांच्या तसबिरीभोवती नोटांची बंडले ओवाळून ती पायदळी तुडवल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर 10 वर्षे धर्मवीर आनंद दिघे यांचा पत्रव्यवहार सांभाळणारे नंदकुमार गोरुले यांनीही जोरदार टीकास्त्र करत मिंधेंचा खरपूस समाचार घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ते म्हणाले, आनंदाश्रमात जे पूर्वी घडायचे त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर केले जायचे. मात्र आता साहेबांच्या नावावर तुम्ही काय काय खपवता, माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल एवढा तुमचा पैसा मोठा झाला? निर्मोही तसेच भीष्म असलेल्या महान व्यक्तीभोवती तुम्ही पैसे कसले उधळता. राजकीय यशावरती तुम्ही दिघेसाहेबांचे मोल मोजू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

ठाणेकरांनो, आता बस्स झालं. सगळ्यांनी बाहेर पडा आणि पैशाच्या जोरावर हिडीसपणा करणाऱ्या गद्दारांना आपली जागा दाखवून द्या, असे आवाहन नंदकुमार गोरुले यांनी केले. तुमची राजकीय ध्येय धोरणं तुम्हाला लखलाख लाभो. पण आमच्या साहेबांना का बदनाम करताय? आनंदाश्रमाचं पावित्र्य तुम्ही नष्ट केलं. पण माझ्यासारखा निष्ठावान शिवसैनिक ही बाब कधीच खपवून घेणार नाही.