उदय कोतवाल, तुषार आपटेला बदलापूर पोलीस वाचवतायत का? एक महिना उलटला तरी पोक्सोचे आरोपी का सापडत नाहीत

आदर्श शाळेतील दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचारानंतर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश हादरला. न्यायालयाच्या निर्देशानंतर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटे यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल झाला. त्यास एक महिना उलटून गेला तरी पोक्सोचे आरोपी पोलिसांना अद्याप का सापडत नाहीत, असा संतप्त सवाल बदलापूरकरांनी केला आहे. कोतवाल व आपटे यांना पोलीस वाचवत आहेत काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दोघेही भाजप व संघाचे कार्यकर्ते असल्यानेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवण्याचा आटापिटा करीत असून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तुषार आपटे यांनी भाजपच्या तिकिटावर नगरपालिकेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांनी शाळेच्या पटांगणातील काही जागा संघप्रणित असलेल्या कल्याण जनसंघ बँकेला भाडेतत्त्वावर दिलेली आहे. तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे हेदेखील भाजपचे असून आदर्श शाळेतली प्रकारानंतर उसळलेल्या आंदोलनात शहरातील अनेक नागरिकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली होती. त्यास विरोध दर्शवण्यासाठी कथोरे यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले. मात्र संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवाला अटक करावी म्हणून त्यांनी कोणतीच भूमिका घेतलेली नाही.

हे घ्या पत्ते

उदय कोतवाल यांचे घर कुळगाव सोसायटीतील दत्त प्रसाद इमारतीत असून संस्थेचे सचिव तुषार आपटे हे वेदांत बिल्डर आणि डेव्हलपर्स असून श्री अपार्टमेंटमध्ये त्याचे बांधकाम व ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहे. तर तिथून जवळच एस. एस. आपटे म्हणून स्वतंत्र निवासस्थान आहे. आपटे याचे बदलापूरनजीक फार्महाऊसदेखील आहे. परंतु पोलीस त्यांच्या घराच्या ठिकाणी अथवा कार्यालयाच्या ठिकाणी फिरकतही नाहीत.