नोव्हेंबरमध्ये रिक्षाची तीन चाके निवृत्त होणार! सुभाष देसाई यांचा हल्लाबोल

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रातील तीनचाकी सरकार निवृत्त होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 70 हजार, देवाभाऊ यांना 80 हजार, तर दादांना 90 हजार पेन्शन मिळणार आहे. त्यातही दर पाच वर्षांनी त्यात आपोआप वाढ होणार आहे. आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान यांना पेन्शनचा हक्क असेल, तर 58 वर्षं कर्मचाऱ्याने सेवा केल्यानंतर पेन्शन मागितली तर त्यात काय चूक?’ असा सवाल सुभाष देसाई यांनी केला. सुभाष देसाई म्हणाले, लोकप्रतिनिधींनादेखील पेन्शन मिळते. मी 22 वर्षे आमदार होतो. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद देऊन मला विधानसभेवर पाठवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील मला पुन्हा-पुन्हा आमदार होण्याची संधी दिली. त्यामुळे मी जनतेची सेवा करू शकलो. या सेवेच्या बदल्यात मला आज  84 हजार रुपये पेन्शन मिळते.