आचारसंहितेपूर्वी मित्राला प्रकल्प देण्याची घाई, अदानी पॉवरला आणखी दोन प्रकल्प; स्पर्धक वीज कंपन्यांना शॉक

adani-group

पंतप्रधानांचे उद्योगपती मित्राचे महाराष्ट्रात ‘उद्योग’ वाढतच असून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी अदानींना प्रकल्प देण्याची घाई झाली आहे. वाढवण बंदर, मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ अदानी उद्योग समूहाने दोन कंपन्यांना धोबीपछाड देत अक्षय ऊर्जा व औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याची बोली जिंकली आहे.

राज्यातील दोन ऊर्जा प्रकल्पांसाठी जेएसडब्लू आणि टोरंट पॉवर या दोन आघाडीच्या कंपन्यांनी बोली लावली होती; पण अदानी समूहाने 6 हजार 600 मेगावॅट अक्षय ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा पुरवण्याची बोली जिंकली आहे. 25 वर्षांसाठी वीज पुरवठा करण्याच्या बोलीत चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. लेटर ऑफ इंटेट जारी केल्यापासून 48 महिन्यांच्या आत वीजपुरवठा करायचा आहे. बोलीच्या अटीनुसार अदानी पॉवर कंपनी  संपूर्ण पुरवठा कालावधीत दोन रुपये 70 पैसे दराने प्रति युनिट दराने सौरऊर्जा पुरवणार आहे, तर कोळशापासून उत्पादित विजेची किंमत कोळशाच्या किमतीच्या आधारावर निर्धारित केली जाईल. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मार्चमध्ये सूर्यप्रकाशापासून निर्माण होणारी पाच हजार मेगावॅट आणि कोळशापासून निर्माण होणारी सोळाशे मेगावॅट वीज खरेदी करण्यासाठी विशिष्ट निविदा काढली होती.

प्रत्येक वेळी अदानीच बाजी कशी मारतात!

वीज नियामक आयोगाने 2024-25 या वर्षासाठी वीज खरेदी किंमत प्रतियुनिट 4 रुपये 97 पैसे निश्चित केली होती. यामध्ये बाजी मारण्यासाठी अदानी पॉवर कंपनीने 4 रुपये 8 पैसे प्रतियुनिट दर लावला, तर जेएसडब्ल्यू एनर्जीने 4 रुपये 36 पैसे प्रतियुनिट दर लावला. अदानींच्या कंपनीने लावलेली बोली एक रुपये प्रतियुनिटने कमी असल्यामुळे अदानी पॉवरने बाजी मारली. दरम्यान, अदानी यांची कंपनी प्रत्येक प्रकल्पात कमी बोली लावून कशी बाजी मारते, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.