सीएची फसवणूक करणाऱ्याला अटक

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे सांगून सीएची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला खार पोलिसांनी अटक केली. साहिल अली अब्बास अली हुसेन असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे सीए असून ते नवी मुंबईत राहतात. जुलै 2022 मध्ये त्यानी एका माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटूची एक जाहिरात पाहिली होती. क्रिकेटपटूने एका कंपनीच्या अॅप्सची जाहिरात केली केली होती. त्याना पैसे गुंतवणूक करायचे असल्याने त्याने त्या जाहिरातीची माहिती घेतली. त्या पंपनीचे कार्यालय वांद्रे येथे असल्याचे समजले. त्यानंतर तक्रारदार हे त्या कंपनीच्या कार्यालयात गेले. कंपनीने गुंतवणुकीसाठी दोन प्लॅन केले होते. सुरवातीला त्यांना गुंतवणुकीतून पैसे येत होते. पण चार महिन्यांनी त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा येणे बंद झाले. त्यामुळे तक्रारदार याने जाऊन त्या पंपनीत चौकशी केली. गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्याबाबत त्याने विनंती केली. त्यानंतर त्याना एप्रिल महिन्यात कार्यालयात येऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. ठरल्यानुसार ते कार्यालयात गेले. तेव्हा ते कार्यालय बंद होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.