Yavatmal News – महिला कर्मचाऱ्याला मानसिक, शारीरिक त्रास देणारे अद्याप मोकाट; विशाखा समितीच्या कारभारावरच प्रश्चचिन्ह

>>प्रसाद नायगावकर

दिवसागणिक महिला अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मिंधे सरकार ‘लाडकी बहीण’ सारख्या फसव्या योजना आणत आहेत. पण याच लाडक्या बहिणी सुरक्षित नसतील तर अशा योजनांचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी ग्रामिण रुग्णालयातीलच सहाय्यक अधिक्षक व अन्य दोघांनी एका कंत्राटी महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांना करण्यात आली. त्यावरून 19 जूनला ग्रामीण रुग्णालय येथे विशाखा समितीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल तीन महिने होऊनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील झरी जामणी ग्रामिण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक सुभाष राठोड, लिपीक सुनील पाटील यांनी कंत्राटी प्रयोगशाळेतील सहाय्यक महिला यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरुवात केले. सततच्या त्रासामुळे अखेर महिला परिचारिकेने सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडे केली. 13 जून रोजी कर्मचारी संघटनेने निवेदनातून याची तक्रार संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली. या तक्रारीवरून यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयातील राठोड यांनी संघटनेच्या तक्रारीवरून 20 जून 2024 रोजी झरी जामणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे विशाखा समितीकडून चौकशी करण्यात आली.

सदर समिती तीन महिन्यांपूर्वी चौकशी करून निघून गेली. परंतु मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागाकडून आजतागयात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागाकडून पाठराखण होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदरहू आरोपी हा स्वतःला यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांचा निकटवर्ती असल्याचे सांगतो. त्यामुळेच कुठे तरी प्रशासनावर दबाव आहे. यामुळेच या दोषींवर कारवाई होत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संघटनेच्या तक्रारीवरून चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो अहवाल 20 दिवसांपूर्वी उपसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. उपसंचालकांच्या निर्देशनुसार समोरील कारवाई करण्यात येईल, असे डॉक्टर सुखदेव राठोड (जिल्हा शल्य चिकित्सक, यवतमाळ) म्हणाले.