यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील बनावट कर्ज घोटाळा प्रकरणातील चारही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तांचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठे कर्ज उचलून फसवणूक केल्याने बँक डबघाईस आली. तसेच ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले. 2.5 अब्ज अपहार प्रकरणी अखेर आर्थिक गुन्हे शाखेने 4 जणांना अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयाने चारही घोटाळेबाजांची 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
बाबाजी दाते महिला बँकेत घोटाळ्यात जबाबदार असलेल्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, त्यांचे पती विलास महाजन, बँक अधिकारी वसंत मोर्लीकर आणि कर्जदार नवलकिशोर मालानी अशी अटक चौघांना पोलिसांनी अटक केली. चौघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला अर्बन बँकेतील 2 अब्ज 42 कोटी घोटाळ्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर दोषींना अटक करण्याची मागणी ठेवीदारांची होती. याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी)कडे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींना न्यायालयात नेताना आणि परत आणताना पोलिसांनी अत्यंत खबरदारी घेतली. ठेवीदारांचा रोष पाहता अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
न्यायालय परिसरात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. पोलीस कोठडी दरम्यान घोटाळेबाजांकडून बरीच माहिती येण्याची शक्यता आहे. आरोपींना अटक झाल्याने इतरही घोटाळेबाज आरोपी फरार झाले आहेत. त्यांना हुडकून अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.