सृजन संवाद – रामायणातील ऋषी जीवन

>>डॉ. समिरा गुजर जोशी

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी श्री गणरायांचे आगमन झाले की, भाद्रपद पंचमीला ऋषिपंचमी साजरी केली जाते. या दिवशी ऋषींचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रमाणे स्वावलंबी व निःस्पृह जीवन जगण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित असते. रामायणात अनेक ऋषींच्या आश्रमांचे वर्णन येते. या लेखात ऋषींचे आश्रम जीवन कसे होते हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

ऋषिपरंपरा हे आपल्या संस्कृतीचे खास वैशिष्टय़ आहे. ऋषींचे आश्रम म्हणजे ज्ञानप्रसाराचे मोठे केंद्र होते. एखादा ऋषी असे म्हटल्यावर त्याचे वसतिस्थान म्हणजे एखादी पर्णकुटी किंवा झोपडी असाच बहुधा आपला समज होतो. पण रामायणातील आश्रमांची वर्णने वाचल्यानंतर लक्षात येते की, एखादे मोठे नगर असावे तशीच ही मोठी वसाहत असे. जिथे लोकांची शहरांमधून वस्ती आहे त्याला ‘जनपद’ असे म्हटले जाई तसेच वनामध्ये असणारे हे ‘आश्रम-पद’ असत.

हो आश्रम नगराबाहेर असत, पण म्हणून ते अगदी दाट अरण्यात असत असेही नाही. आश्रम अशा भागात असे जिथे हिंस्र प्राण्यांचा वावर फार नसेल. तसेच झाडेसुद्धा या भागात फार घनदाट नसत. कारण खूप दाट झाडे असतील तेथे वणवा लागण्याचे भय असते. श्रीरामांनी वनवास स्वीकारल्यानंतर ते लक्ष्मण आणि सीता यांच्या समवेत गंगा ओलांडून पलीकडे गेल्यानंतर त्यांना सर्वप्रथम भारद्वाज मुनींचा आश्रम लागला. त्या वेळेस वाल्मीकी मुनींनी वर्णन केले आहे की, ‘घरांमधून, यज्ञशाळांमधून येणारा धूर दिसायला लागला. आणखी पुढे गेल्यावर लक्षात आले की, लाकडे कापून नीट रचून ठेवण्यात आली आहेत. यावरून जवळपास कुठेतरी आश्रम असला पाहिजे असा अंदाज रामचंद्रांनी बांधला.’

भारद्वाज मुनींनी श्रीरामांचे स्वागत केले आणि त्यांनी वनवासाचा काळ या आश्रमात राहूनच घालवावा असे सुचवले. आश्रम जनपदाच्या कक्षेबाहेर असल्याने आपण आपल्या प्रतिज्ञेचे पालन करू शकाल असे त्यांनी सुचवले. पण ही जागा अयोध्येच्या फार जवळ असल्याने येथे लोक मला भेटण्यासाठी सतत येत राहतील, तेव्हा मी अधिक एकांताची जागा शोधतो असे श्रीरामांनी त्यांना सांगितले. यावरून आश्रम नगरांपासून खूप लांब नसत हे लक्षात येते.

वनवासात राहणाऱया या मुनींचे आणि वनवासी लोकांचे भोजन साधे असे. यासंदर्भात नीवाराचा उल्लेख अनेकदा होतो. नीवार म्हणजे वनात आपोआप उगवणारे तृणधान्य होय. हे त्यांचे प्रमुख अन्न मानले जाई. यामध्ये वरीचे तांदूळ, शिंगाडय़ाचे पीठ, हिंगोली फळांचे पीठ अशा वनात मिळणाऱया गोष्टींचा समावेश होत असे, असे अभ्यासकांनी सांगितले आहे. (म्हणूनच आपण ऋषिपंचमीच्या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काही खात नाही.) अयोध्या कांडात उल्लेख येतो की, चमचमीत चटण्या आणि कोशिंबिरीयुक्त भोजन करण्याची सवय असलेली सीता वनातील नैवार आहार कसा बरं खाईल? स्वत श्रीरामांनीही भारद्वाज ऋषींना मी तपोवनाचे सर्व नियम पाळून कंदमुळे खाऊन येथे राहीन असे म्हटले आहे. यावरून आश्रमातील राहणीमान किती साधे असले पाहिजे याची कल्पना येते.

श्रीरामांनी उल्लेख केलेल्या तपोवनाच्या नियमांचा विचारही या ठिकाणी करायला हवा. हे आश्रम राजसत्तेसाठीही आदरपूर्वक नतमस्तक होण्याचे स्थान होते. आजच्या भाषेत ढोबळपणे सांगायचे तर समाजाचे नियम (Legislature) तयार करण्याचा अधिकार मुनींकडे होता आणि त्याची अंमलबजावणी (Administration) राजा करत असे. पुढे कालांतराने यात बराच बदल झाला. पण रामायणात तरी राजा ऋषीमुनींच्या सल्ल्याने राज्यकारभार करताना दिसतो. त्यामुळे आश्रम हे ऋषींच्या अधीन असत. तिथे राजा प्रवेश करतानाही परवानगी विचारत असे. तेथील शांती आणि तपसाधना भंग होणार नाही, त्याचे पावित्र्य जपले जाईल याची काळजी घेत असे.

पण याचा अर्थ हे आश्रम आर्थिकदृष्टय़ा संपन्न नसत असा नव्हे. राजाकडून तसेच अन्य धनिकांकडून त्यांना आर्थिक पाठबळ मिळत असे. श्रीराम जेव्हा वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी आपला खासगी कोश रिकामा केला. हे दान ज्यांना दिले त्यांच्यामध्ये त्यांचा सेवक वर्ग होता, मित्रपरिवार होता, तसेच मोठमोठे आचार्यही होते. त्रिजट नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या आश्रमाची व्यवस्था व्हावी म्हणून श्रीरामांनी अनोख्या पद्धतीने दान दिले. श्रीरामांनी त्यांना हाती असलेला धर्मदंड सर्व ताकदीनिशी फेकायला सांगितले. तो जेवढय़ा अंतरावर पडेल त्या प्रदेशात मावतील तितक्या गायी देण्याचे कबूल केले. त्रिजट ऋषींचा दंड शरयू नदीच्या पैलतीरी पोहोचला, तर श्रीरामांनी तेवढय़ा भागात सामावतील एवढय़ा गायी दिल्या. यावरून आश्रमांना किती भरघोस दान मिळत असेल याची कल्पना येते. याचे आणखी एक बोलके उदाहरण म्हणजे वर उल्लेखलेल्या भारद्वाज ऋषींनी जेव्हा त्याच वाटेने श्रीरामांना शोधत आलेल्या भरताची भेट घेतली तेव्हा त्यांनी भरतासमवेत त्याच्या बरोबर आलेल्या सगळ्या सैन्याची उत्तम बडदास्त ठेवली. आयत्या वेळेस आलेल्या मोठय़ा सैन्याला कंदमुळे नव्हे तर सुग्रास अन्न खाऊ घातले. भरत हा अयोध्येचा होऊ घातलेला नवा राजा आहे हे लक्षात घेऊन त्याचे राजेशाही स्वागत करण्यात आले. आजच्या एखाद्या विद्यापीठाने देशाच्या राष्ट्रपती वा शासकीय पदाधिकाऱयाचे स्वागत करावे तसेच हे होते. यावरून या आश्रमांची सुसंपन्नता आणि सुसज्जता लक्षात यावी.

[email protected] (निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)