जवळपास दीड वर्ष होत आलं मात्र मणिपूर शांत होण्याची चिन्ह दिसत नाही. आता मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून पुन्हा रस्त्यावर निदर्शने सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि यंत्रणांनी प्रयत्न करत असल्याचे दावे करत असले तरी ईशान्येकडील या राज्यात अशांतताच कायम असल्याचं दिसत आहे. मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून मैतेई आणि कूकी अशा दोन्ही समुदायातील हजारो लोक प्रभावित झाले आहेत.
हिंसाचाराचे बळी खोऱ्यात आणि टेकड्यांवर पसरलेले आहेत, हजारो लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले आहेत. अनेक जण आता मदत छावण्यांमध्ये किंवा केंद्र सरकारने दिलेल्या तात्पुरत्या घरांमध्ये राहत आहेत.
इंडिया टुडे टीव्हीने यासंदर्भात ग्राऊंड रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमधून अस्वस्थ करणारी अशी माहिती समोर आली आहे. संबंधित वत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या घरांना त्यांनी भेटी दिल्या, घरातून आणि गावातून विस्थापित झाले आहेत त्यांना भेटी दिल्या. ते आता डोंगराळ भागात अत्यंत कठीण परिस्थितीत राहत आहेत, वेदना आणि आघाताने त्यांच्या जीवनात एकप्रकारची मोठी दहशत निर्माण झाली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
कांगपोकपी जिल्ह्यातील फैजांग टेकड्यांमध्ये, सुमारे 700 विस्थापित कुकी मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.
या भाग राहणाऱ्या कुकींनी मे 2023 च्या शेवटच्या आठवड्यात वांशिक संघर्षाच्या शिखरावर असताना हल्लेखोरांनी त्यांचे गाव जाळले, त्यांची घरे उद्ध्वस्त केली आणि अनेक वाहनांचे नुकसान देखील करण्यात आले.
पायथ्याशी असलेल्या किंवा आसपासच्या भागात असलेल्या, या कुकी कुटुंबांनी टेकड्यांवर पळ काढला आणि शाळा आणि मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला. काहींना डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आपल्या नातेवाईकांकडे धाव घेतली. पण अनेकांना मात्र तात्पुरत्या छावण्यांमध्ये महिने घालवावे लागले, प्रशासन किंवा चर्चद्वारे पुरविलेल्या अन्नावर ते कसेबसे जीवन ढकलत होते. अखेरीस, या विस्थापितांपैकी हजारो लोकांना कांगपोकपी आणि इतर भागात वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेल्या घरांमध्ये पाठवण्यात आले.
मदत मोहीम सुरू झाली तेव्हा केंद्र सरकारने दरी आणि डोंगर या दोन्ही भागात पीडितांसाठी पूर्वनिर्मित घरे दिली. मात्र ही मदत पुरेशी नसल्यानं आणि अन्य समाजातील लोकांचे हल्ले होण्याची दहशत काम असल्यानं इथेही लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
मोमोई नावाच्या एका कुकी स्त्रीचा अनुभव वृत्तात मांडण्यात आला आहे. ‘मे महिन्यात हिंसाचार सुरू झाला. जमावाने येऊन आमची घरे जाळली. अनेक लोक मारले गेले आणि प्रचंड गोळीबार झाला. आम्ही सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेलो आणि कांगपोकपी गावात पोहोचलो, जिथे माझे एक नातेवाईक आहेत. आमच्यापैकी बरेच जण शाळा किंवा मदत शिबिरांमध्ये राहत होते आणि या वर्षीच्या जूनपासून, मला हे घर मिळाले आहे. शिबिरांमध्ये अनेक मुले आणि महिला आहेत आणि आपल्या सर्वांना एकच प्रश्न आहे – परिस्थिती कधी सामान्य होईल आणि आपण घरी परत कधी जाऊ शकू?’
स्थलांतरित झाल्यापासून एकट्या या मदत शिबिरात 10 अर्भकांचा जन्म झाला आहे. अशा सर्व मदत शिबिरांची माहिती घेतली तर ही संख्या अधिक असेल, असं सांगण्यात येतं.
या मदत शिबिरात मुलभूत सुविधांचा अभाव आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. या सोयी सुविधांअभावी बालकांसह चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब या वृत्तातून समोर आली आहे. कुकी कार्यकर्ते मोई म्हणतात, ‘या विस्थापित कुटुंबांसाठी जीवन खूप कठीण आहे. येथे चार लोक मरण पावले. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया ज्यामध्ये दोन मुलंच होती. ते अत्यंत आजारी होते मात्र उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आम्ही आमच्या खोऱ्यातील घरांपासून पूर्णपणे दूर आहोत’.
मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या पुरुष आणि तरुणींना काम शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ज्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणं देखील कठीण होत आहे. काही महिला पिशव्या बनवून विकत आहेत आणि कसेबसे दोन पैसे कमवत आहेत असं सांगण्यात आलं.
हिंग्लेम हाओकीप या शिक्षकाचे म्हणणे आहे, ‘आम्हाला घरी जायचे आहे. सरकारने आम्हाला सुरक्षा पुरवली पाहिजे. आम्हाला शिबिरात मिळणारी सर्व मदत, अगदी जेवणही सरकारकडून मिळते. मात्र इथे राहणे खूप कठीण आहे’.
लहान मुले स्थानिक शाळांमध्ये जात आहेत, मात्र पालकांना त्यांच्या भविष्याबद्दल चिंता कायम आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून, सुमारे 41,450 कुकी विस्थापित झाले आहेत. कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशननुसार, आतापर्यंत सुमारे 199 कुकींचा मृत्यू झाला आहे, 7,000 हून अधिक घरे जाळली गेली आहेत आणि 200 हून अधिक कुकी गावांना लक्ष्य करण्यात आले आहे. दोन समाजात उफाळलेल्या संघर्षादरम्यान मरण पावलेल्या अनेक कुकींना परिसरात दफन केलं जात आहे.
कुकींची सर्वोच्च संस्था असलेल्या आदिवासी एकता समितीने मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक ‘वॉल ऑफ रिमेंबरन्स’ तयार केली आहे.
या शिबिरांमध्ये राहणाऱ्यांच्या मनात वेदना, आघात आणि चिंता आहे. विस्थापितांना आपल्या घरी जायची ओढ लागली आहे. सरकारकडून सुरक्षा मिळाली पाहिजे, अशीच मागणी इथले लोक करत आहेत.