सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ही चूकच; कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी घटनेच्या तत्वांवर ठेवलं बोट

गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गेले. पंतप्रधान मोदींनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत आरतीही केली. पण पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीशांच्या या भेटीने वादाला तोंड फुटले आहे. यावर वकीलांकडूनही टीका होत आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनीही आक्षेप घेतला आहे. आता या विषयावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान आणि सरन्यायाधीश दोन्ही घटनात्मक पद आहेत. घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जातेय. घटनेत सगळ्याच गोष्टी लिहलेल्या नसतात, घटना उत्क्रांत होत गेलेली असते. प्रसिद्धीपासून न्यायाधीशांनी दूर राहावं, असं म्हणलं आहे. पण याकडे दुर्लक्ष झाल्याचं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.

सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ही चूक आहेच. मात्र, जर पंतप्रधान आपणहून त्यांच्याकडे गेले असतील तर सरन्यायाधीशांनी अशी भेट चुकीची आहे, हे सांगायला पाहिजे. लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांवर असते. आणि असं काही होत असेल तर ही चूक झाली आहे, असंही उल्हास बापट म्हणाले.