पुण्यात करोडोंचे ड्रग्स, गुटखा येतो कुठून? रात्रीची वाहतूक अन् सक्रिय माफिया

पुणे शहरात मागील काही दिवसांत कोट्यावधींचे अंमली पदार्थ (एम.डी), लाखो रुपयांचा गुटखा, गांजा पकडण्यात आला असून विक्रेत्यांना अटक करण्यात आली. सातत्याने या कारवाया केल्या जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, गुटखा शहरात येतो तरी कोठून अशा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठ्या गोडावूनसह अनेक छोट्या दुकानांमध्ये गुटखा मिळतो. या व्यतिरिक्त छुप्या पद्धतीने सुरू असलेली विक्री, परजिल्ह्यासह, परराज्यातून शहरात होणारी करोडोंची आवक यामुळे शहरात ड्रग्ज, गुटखा माफिया चांगलेच सक्रिय असल्याचे दिसत आहे.

राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू,सुपारी व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्य पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. असे असले तरी पुण्यात गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील अनेक कारवायांमधून हे अधोरेखित झाले आहे. तर, गेल्या काही दिवसांत एम.डी या अंमली पदार्थांसह गांजा विक्रेत्यांवर देखील अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. शहरातील कोंढवा, विमानतळ, चंदननगर, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, स्वारगेट, चतुःश्रुंगी, खडक, विश्रांतवाडी, नगररस्त्यासह इतर ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक ठिकाणाहून पोलिसांनी लाखोंचा साठा जप्त करून तस्करांना अटक केली. यावरून शहरात मोठ्या प्रमाणात याची आवक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही वाहतूक केली जाते. त्यामुळे करोडोंची उलाढाल असलेला हा व्यवसाय शहरात खुलेआम सुरू असल्याचे दिसत आहे. शहरासह उपनगरात देखील गुटखा माफिया सक्रिय आहेत.

…अवैध धंद्याना अभय, वसुलदार ॲक्टिव्ह

एम.डी, गांजा, गुुटखा तस्करांनी पुण्यात जाळे तयार केले आहे. त्यामुळे काहींंना अटक केल्यानंतरही त्यांचा हा व्यवसाय सुरू राहतो. यातच अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असून त्यावरील कारवाई मागील काही दिवसांपासून थंडावली आहे. पोलीस आयुक्तांनी विविध पोलीस ठाण्यातील 65 वसूलदार कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या असल्या तरी यातील अनेकजण जून्या हद्दीत वॉच ठेवून असल्याच्या चर्चा आहेत. अनेक ठिकाणी वसुलदार काम करत असून संबंधित पोलीस ठाणे प्रभारींकडून त्याकडे डोळेझाक केली जातीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अवैध धंद्यावर कारवाईसाठी नेमलेल्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कामगिरी ढेपाळल्याने अशा धंद्याना अभयच मिळत आहे.