शिमल्यातील एका मशिदीच्या संकुलात कथित बेकायदेशीर बांधकामासंदर्भात निषेध मोर्चा निघाला. यावेळी तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर संघर्ष होऊन एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
शिमल्यातील व्हिडीओमध्ये आंदोलनकर्ते पोलिसांचे बॅरिकेड्स पाडताना आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी लाठीचार्ज आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करताना दिसत आहेत. आंदोलकांनी ‘हिमाचल ने थाना है, देवभूमी को बचाना है’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.
शिमल्याच्या संजौली भागात असलेल्या मशिदीमध्ये कथित बेकायदेशीर मजल्यांच्या बांधकामाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. यापूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले होते की लोकांना निषेध करण्याचा अधिकार असला तरी त्यांनी शांततेने आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करता ते करावे.
‘आपल्या राज्यात कधीच जातीय दंगली झाल्या नाहीत. हिमाचलला देवभूमी म्हणून ओळखले जाते. सध्या परिस्थिती सामान्य आहे आणि दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरू आहे. आंदोलन करणे हा लोकांचा अधिकार आहे, पण सर्व काही कायद्याच्या मर्यादेतच झाले पाहिजे’, हिमाचल प्रदेशचे मंत्री रोहित ठाकूर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे.
संजौली मशिदीतील कथित बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावर स्थानिक महापालिका न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि तो कायदा मार्गी लागेल, असेही सुखू म्हणाले होते.
मशिदीमध्ये अतिरिक्त मजल्यांच्या बांधकामावरून तणाव वाढल्यानंतर आणि काही हिंदू संघटनांनी बंदची हाक दिली होती.
निषेध मोर्चापूर्वी धल्ली बोगद्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस चौक्यांवरही वाहनांची तपासणी करण्यात येत होती.