अजितदादांना हवा मुख्यमंत्रीपदाचा ‘वादा’; महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवा, शहांपुढे प्रस्ताव ठेवल्याची चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शहा यांच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अनुपस्थित होते. राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगल्यानंतर शहा दिल्लीला निघाल्यावर धावतपळत अजित पवार यांनी त्यांची मुंबईतील विमानतळावर भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा वादा करण्याची आणि महाराष्ट्रामध्येही बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी केल्याची चर्चा आहे. ‘द हिंदू’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान वर्षा व सागर बंगल्यावर गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनालाही गेले. मात्र तिन्ही ठिकाणी अजित पवार गैरहजर होते. मुंबईत असूनही अजित पवारांनी इकडे पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र शहा दिल्लीला निघाल्यानंतर अजित पवार मुंबई विमानतळावर आले आणि तिथे त्यांच्यात छोटेखानी बैठक पार पडली.

शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा वादा मागितला. महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव अजितदादांनी शहांपुढे ठेवला. अर्थात मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यात काही तथ्य नसल्याचे सांगितले.

विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार; अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात भीती!

25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत

जागावाटपावरूनही महायुतीमध्ये फटाके उडत आहेत. भारतीय जनता पक्ष 150 जागा, अजित पवार गट 70 जागा, तर उर्वरित जागांवर मिंधे गट आणि इतर मित्रपक्ष लढण्याची शक्यता आहे. यापैकी 25 जागांवर रस्सीखेंच सुरू असून तिथे मैत्रीपूर्ण लढत व्हावी असे भाजपने मिंधे व अजित पवार गटाला सांगितले आहे.