बँकेचे कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली वृद्ध महिलेची 7 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अंजू जरीवाला असे तिचे नाव आहे. तिच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या वांद्रे परिसरात राहतात. त्यांनी काही रक्कम त्यांच्या मुलाच्या खात्यात ठेवली आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर एका नंबरवरून पह्न आला. पह्न करणाऱ्याने तो खासगी बँकेचा अधिकारी असल्याचे भासवले. कार्डच्या नावाखाली ठगाने त्यांच्या मुलाकडून बँकेचा तपशील घेतला. काही वेळाने त्याने मुलाचा मोबाईल तपासला असता, त्याच्या खात्यातून 7 लाख 25 हजार रुपये गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला.
वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकातील उप निरीक्षक शंकर पाटील आदी पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक गुजरात येथे गेले. पोलिसांनी सुरत येथे फिल्डिंग लावून अंजूच्या मुसक्या आवळल्या.