>> गणेश कुंटेवार
रझाकारांशी झालेल्या रणसंग्रामात तालुक्यातील कल्हाळीच्या ३६ जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. ज्या नाईकांच्या गढीवर रझाकारांनी ३६ जणांचा खात्मा केला. ती गढी आज जमीनदोस्त झाली आहे. मात्र, हा वैभवशाली इतिहास नवीन पिढीसमोर ताजा राहावा यासाठी तत्कालीन अंतुले सरकारने उभारलेल्या हुतात्मा स्मारकास निधी व जागा मिळू नये हे दुर्दैवच. यावर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अधिवेशनात निधी उपलब्ध करून देऊन येथील इतिहास पुन्हा जिवंत करण्याचे थापाड्या मिंधे सरकारचे आश्वासन मात्र हवेतच विरल्याने कल्हाळीकरांत संताप पसरला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरून कल्हाळीमध्ये स्मारक उभारले जाईल, अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. पण तब्बल दोन वर्षांत तेथे निधीचा छदामही देण्यात आला नाही. मराठवाड्यात निजामाविरोधातील लढ्यात कंधार तालुका आघाडीवर होता. त्यात केशवराव कुलकर्णी यांचा मोठा पुढाकार. कुलकर्णी यांनी तरुणांची मोठी फळी उभारली. त्यात अनंतराव मामडे, गोविंदराव मोरे, राजाराम मामडे, बालकृष्ण वडवळकर, भगीरथराव, स्वतःला या संग्रामात झोकून दिले. यातीलच तिरंगा झेंडा घेऊन रस्त्यावर आलेल्या माणिकराव काळे या तरण्याबांड युवकास भररस्त्यात गोळी घालून रझाकारांनी यमसदनी पाठवले.
कंधारपासून अवघ्या २२ कि. मी. अंतरावरील कल्हाळी गावाने रझाकाराविरोधात मोठे बंड उभारले होते. येथील मोठे प्रस्थ अप्पासाहेब नाईक यांनी रझाकाराविरोधात मोठी फौज उभी केली. २९ जून १९४८ रोजी सहाशे लोकवस्तीच्या गावास दोन ते अडीच हजार रझाकार व ५०० पोलिसांनी वेढा दिला. गावातील सर्वच स्त्री पुरुष दीड दोन एकरच्या विस्तीर्ण गढीत जमले आणि तेथून रझाकांराचा प्रतिकार सुरू केला. या प्रतिकारात अनेक रझाकार ठार झाले. त्यामुळे चिडलेल्या रझाकांरानी जाळपोळ व लुटालूट सुरू केली. २९, ३० जून व १ जुलै असे तीन दिवस हा संगर सुरू होता.
दारूगोळा संपला तरी गावकऱ्यांनी गोफणीच्या साह्याने लढा दिला. नंतर रझाकार गढीत उतरले. गढीसमोरील चिरेबंदी ओट्यावर उभे करून गावकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. तर ३५ जणांना अप्पासाहेबासह महादू बाबा मरेवाड, जयराम बाबा मरेवाड, लिगोंजी गंगाराम वाघमारे, माणिक किशनराव वाघमारे, अमृता भाऊराव वडजे, नागनाथ लक्ष्मण वडजे, शेकोजी काळ्या सोनकांबळे, सुभावजी काळबा सोनकांबळे, शेटीबा माणिका बनसोडे, नारायण महादू शेळके, माणिका भुंजगा शेळके, रामराव महादू शेळके, एकनाथ महादू शेळके, मारोती भुंजगा खडके, पुंडलिक बाबा वडजे, गोविंद नारायण खंदारे, अर्जुन शिवराम सोनकांबळे, संभाजी धोडींबा टोळ, संभाजी बाबाराव गायकवाड, संभाजी घोडींबा दुधवाड, शंकर खेलबा वडजे, नागोराव मानेजी वडजे या ३५ शूरवीरांना एका दोरीत बांधून जाळण्यात आले तर जखमी तुकाराम जळबा बेलाडे लगेचच ३६वा शहीद झाला.
आत्मबलिदानाचा इतिहास ऐकताना अंगावर शहारे येतात. त्या वीरांनी तो कसा सोसला यांची स्फूर्तिदायक व मार्गदर्शक इतिहासाचे भावी पिढीला स्मृती लक्षात राहावी ह्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहेमान अंतुले यांनी स्मारके उभारण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वाससुद्धा नेला. जिल्ह्यात सर्वाधिक हुतात्मे कंधार तालुक्यात होऊनसुध्दा अवघ्या दोनच गावांत हुतात्मा स्मारक उभारण्यात आले त्यात टेळकी (ता. लोहा) व दुसरे कंधारचा समावेश आहे. ह्या दोन्ही स्मारकांची अवस्थाही चांगली नाही. विशेष म्हणजे ज्या एका कल्हाळी गावाने ३६ हुतात्मे दिले. त्यामध्ये मराठा, कुल्लेकुडगी, महादेव कोळी, मुस्लीम व बौध्द, मातंग ह्या सर्व स्तरातील विरांनी योगदान दिले. असे ११३ स्वातंत्र्यसैनिक गावात असतानाही ह्या गावात हुतात्मा स्मारक नाही. ज्यामुळे या ऐतिहासिक स्मृती अस्पष्ट होत आहेत. ज्या गढीवर हा ऐतिहासिक रणसंग्राम घडला तिचे काही दगडधोंडे, चिरे आपल्या आठवणी जपत तग धरून आहेत. येथे साधे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. बसही केव्हा तरी गावात जाते तीही स्वातंत्र्यसैनिक असतात म्हणन नावालाच चालते. येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. गढीचे मालक नाईक परिवार गाव सोडून जिल्हास्तरीय वास्तव्य करत आहेत. मुलभूत सुविधासाठी आजही शासन दरबारी खेटे मारावे लागतात.
रझाकारांनी छळले तर लढा देऊन सुटका करून घेतली पण आता मात्र गावात हुतात्मा स्मारक व्हावे ही मनोमन इच्छा असतानाही गावात जागा नाही असे बोलून सरकार ३६ हुतात्म्यांची अवहेलना करत आहे. त्यामुळे भावी पिढीसाठी हा प्रेरणादायी इतिहास काळाआड जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या थापाड्या सरकारच्या अधिवेशनात मोठ मोठ्या वल्गना केल्या. त्यात शासनाने विशेष लक्ष दिले तर विशेष सुविधा उपलब्ध होतील मात्र त्यासाठी वेळ नाही. ७०० लोकवस्ती असलेल्या गावाने दिलेला गुलामगिरी विरोधातील लढा अंगावर काटा आणतो. आज हुतात्म्याचे नातेवाईक पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतात. ज्यानी बलिदान दिले त्यांच्या स्मारकासाठी शासनाकडे मुहूर्त नाही. समस्याचे ओझे घेऊन गाव विकासासाठी कुठवर वाट पाहणार? हा यक्ष प्रश्न सतावतो आहे. ज्यांनी बलीदान केले. त्याव्यतिरिक्त कित्येकांना हात पाय गमवावे लागले, त्यांना मात्र कागदपत्रांच्या गर्दीत चुप बसावे लागते. अधिकारी मात्र साचेबद्ध उतर देऊन मोकळे होतात.
निधीबाबत तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. पण आजपर्यंत कुठलाही निधी उपलब्ध नाही. निधी उपलब्ध झाल्यावर तेथे स्मारक उभारले जाईल. याबाबत अधिक माहिती देताना उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार म्हणाल्या की, वरिष्ठ स्तरावर स्मारक उभारले जावे यासाठी पाठपुरावा सरू आहे