कितीही कपडे खरेदी केले तरी मन कधीच भरत नाही हे वास्तव आहे. लाखो लोकांच्या कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते आणि आपल्या निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भविष्यात प्लॅस्टिक प्रमाणे वस्त्रदेखील ही उद्याची मोठी समस्या होऊ शकते, हे लक्षात घेता लोअर परळ येथील पंचगंगा उत्सव मंडळाने यंदा ‘वस्त्र – एक विचार… एक व्रत… एक संस्कृती’ या विषयावर देखावा साकारला आहे.
कपड्यांचा पुनर्वापर हा यंदाच्या गणेशोत्सवाच्या सजावटीचा विषय आहे. या विषयासंबधीची संपूर्ण सजावट मंडपात करण्यात आली आहे. जूने कपडे नवीन पद्धतीने करण्याचा संकल्प मंडळाने केला असून याचाच एक भाग म्हणून पुनर्निर्मिती झालेले कपडे वाडा-मोखाडा येथील आदिवासी पाडयातील लहान थोर मंडळींना वस्त्र दान करण्यात आले. याशिवाय मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी गोधडी काम कार्यशाळा घेण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पारंपारिक वस्त्रांबद्दल जन जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन केले. सुमित पाटील याच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला असून यासाठी कापड, लापूड, पेपर आणि रिसायकल मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. अशाच प्रकारे गणेशभक्तांनी पर्यावरण पूरक देखावे साकारावेत अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.