काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत. मात्र त्यामुळे त्यांचे गणित कच्चे आहे व त्यांना निराशेने ग्रासले आहे हेच स्पष्ट होते. स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे!
हरयाणा, जम्मू-कश्मीर या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा चेहरा दोन्ही राज्यांत चालणार नाही यावर दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्र व झारखंड राज्यांच्या निवडणुकाही हरयाणाबरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण इथेही मोदी-शहांचे चेहरे लोकांना पसंत नाहीत. मिंध्यांनी गुवाहाटीत रेड्यांचे कितीही बळी दिले तरी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपरिवर्तन होणार नाही, असेच एकंदरीत वातावरण आहे. पुन्हा ज्यांना स्वतःचा चेहरा धड नाही असे देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करतात हे गमतीचे आहे. महाराष्ट्राला मोदी-शहा मान्य नाहीत व फडणवीसांचा बदनाम चेहरा राज्यातील जनतेने नाकारला आहे, पण स्वतःचा चेहरा झाकून फडणवीस यांनी जाहीर केले की, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील. ही नसती उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला? अशा उठाठेवी करण्याआधी आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. मुळात त्यांच्या तथाकथित महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस-मिंधे व अजित पवार यांच्यातच खेचाखेची सुरू आहे. फडणवीस हे ठामपणे सांगू शकतील काय की, 2024 ला निवडणुका होताच मिंधे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील? अजितदादा तर मुख्यमंत्रीपदासाठी इतके उतावीळ आहेत की, त्यांनी स्वतःला गुलाबी रंगात न्हाऊन घेतले आहे आणि फडणवीस तर नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ‘‘शुक।s। शुक।s’’ करून बोलवत आहेत. या तिघांच्या तीन तऱहा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे. फडणवीस हे महाविकास आघाडीच्या
चेहऱ्याची उठाठेव
करतात, पण स्वतःच्या महायुती वगैरेबाबत मात्र ते सांगतात की, ‘मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवू. विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, परंतु नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही.’ यांच्याच बुडाखालची स्थिती ही असताना हे महाशय दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत? ‘लाडकी बहीण योजने’च्या श्रेयावरूनही तिघांमध्ये बिघाडी आहे. ती आधी दुरुस्त करा आणि मग इतरांच्या चेहऱ्यावर बोला! 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील व ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतील असे फडणवीसांना किंचितही वाटले होते काय? पण ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून व जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले. आपल्या साधेपणाने त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले. ठाकऱ्यांच्या अडीच वर्षांच्या काळात कट-कारस्थानांचे गावठी उद्योग महाराष्ट्रात बंद झाले हे सत्य नाही काय? पण दिल्लीत कट-कारस्थाने घडवून गुजराती व्यापाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले व मिंधेंसारखे मतलबी लोक डरपोक स्वभावानुसार दिल्लीकरांना शरण गेले. यात शौर्य ते कसले? स्वतः फडणवीस हे अपमान सहन करून सध्या सत्तेत आहेत. त्यांचा चेहराच त्याची साक्ष देतोय. अशा फडणवीसांना उद्धव ठाकरे यांचा चेहरा त्रास देत आहे. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहत नाही हे फडणवीसांचे मत आहे. मुळात फडणवीस यांचे गुप्तहेर व राजकीय आकलन तोकडे पडत आहे. त्यांच्या छचोर चाणक्यगिरीचा बाजार उठल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचेच नाही, पण महाविकास आघाडीने एक चेहरा समोर आणावा, मी त्यास पाठिंबा देतो, असा खुला आवाज ठाकरे यांनी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला वगैरे प्रमुख नेत्यांसमोर दिला. कारण बिनचेहऱ्याने निवडणुकांना सामोरे जाणे अडचणीचे ठरेल. शरद पवार, नाना पटोले वगैरे नेत्यांनी
आपापल्या पक्षातील
कोणत्याही नेत्याचे नाव संमतीने पुढे करावे, शिवसेना त्यास पाठिंबा देईल. असे विधान करायला वाघाचे काळीज लागते. त्याबद्दल उद्धव ठाकरे हे कौतुकास पात्र आहेत. संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे हे धोक्याचे ठरते. याच संख्याबळाच्या प्रकरणात भाजपने तीन निवडणुकांत शिवसेनेचे उमेदवार पाडले ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण हे शिवसेना आमदारांचा आकडा कमी कसा होईल यास खतपाणी घालणारे होते. फडणवीसांनी तेच केले व आता महायुतीत तोच पाडापाडीचा खेळ होणार हे निश्चित आहे. हा खेळ महाविकास आघाडीत रंगू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी समंजस भूमिका घेतली. मात्र त्यामुळे फडणवीस यांच्या पोटातली कळ ओठातून बाहेर पडली. महाविकास आघाडीचा चेहरा कोण? यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी निकाल दिला आहे. महाराष्ट्राचे जनमानस वेगळे व नेत्यांच्या मनात वेगळे असे होणार नाही. सगळेच पक्ष रोज सर्वेक्षणे वगैरे करून निर्णय घेत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचा कौल त्यांच्यापर्यंत पोहोचलाच असेल. काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत. मात्र त्यामुळे त्यांचे गणित कच्चे आहे व त्यांना निराशेने ग्रासले आहे हेच स्पष्ट होते. स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे!