आम्हाला फरफटत नेलं तेव्हा काँग्रेस आमच्या सोबत होती; फोगाट, पुनिया राजकारणात

आंदोलनात आम्हाला रस्त्यावरुन फरफटत नेलं तेव्हा कॉंग्रेस आमच्या सोबत होती, असे सांगत शुक्रवारी कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. महिन्याभरानंतर हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक आहे. फोगाट व पुनियाच्या कॉंग्रेस प्रवेशाने भाजपला चांगलाच झटका बसण्याची चिन्हे आहेत.

कॉंग्रेस प्रवेश करण्यापूर्वी विनेश व बजरंगने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला. हे दोघेही ओएसडी स्पोर्ट्स पदावर कार्यरत होते. या दोघांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली व नंतर कॉंग्रेस मुख्यालय गाठून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. विनेश विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

जिंद जिह्यातील जुलाना मतदारसंघातून तिला तिकिट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विनेश 11 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे काँग्रेस सुत्रांचे म्हणणे आहे. तर बजंरगला स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी मिळू शकते. त्याला संघटनेत मोठे पद दिले जाण्याचीही शक्यता आहे.

कॉंग्रेसमध्ये असल्याचा अभिमान

वाईट काळात आपल्यासोबत कोण आहे हे कळते. महिला खेळांडूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आम्ही लढा उभारला. या लढ्यात भाजत वगळता सर्व राजकीय पक्ष आमच्यासोबत होते. महिला अत्याचार व गैरवर्तनाच्या विरोधात ठामपणे उभ्या असलेल्या कॉंग्रेस पक्षात आज आम्ही आहोत याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया फोगाटने कॉंग्रेस प्रवेशानंतर दिली.