तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींनी आज रमाधाम वृद्धाश्रम गहिवरून गेले होते. येथील आजी-आजोबांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे सूर रमाधाममध्ये उमटले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने तसेच माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून रमाधाम वृद्धाश्रम साकारला आहे. मनमोहक हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे ही वास्तू पवित्र झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सूरताल भजनी मंडळाचे समीर ढोंबरे, रूपेशबुवा देशमुख तसेच सागर बोरडे यांचे सुश्राव्य भजन झाले. बबन पाटील यांनी उपस्थितांना माँसाहेबांच्या आठवणी सांगितल्या.
यावेळी माजी तालुकाप्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश कडव, संपर्कप्रमुख सुनील पाटील, रायगड जिल्हा महिला संघटक सुवर्णा जोशी, उपजिल्हा संघटक अनिता पाटील, चिंतामण चव्हाण, खुटारीगाव शाखाप्रमुख संतोष म्हात्रे, खोपोलीचे शहर संघटक दिलीप पुरी, विलास चाळके, महिला आघाडी तालुका संघटक वैजयंता गायकवाड, सचिन पाटील, वसंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.