राहुल गांधी यांची भेट अन् रेल्वेने विनेशला पाठवली कारणे दाखवा नोटीस, केसी वेणुगोपाल यांचा आरोप

हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी राजकारणाच्या आखाड्यात एंट्री मारत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र काँग्रेस प्रवेशापूर्वी विनेश फोगाटला रेल्वेमधील नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे. राहुल गांधी यांची भेट घेतल्यामुळे रेल्वेलकडून विनेशला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केला आहे.

कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आज (6 सप्टेंबर 2024) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मात्र काँग्रेस प्रवेशापूर्वी विनेशला तिच्या रेल्वेमधील नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे.

यावरून केसी वेणुगोपाल यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विनेश फोगाटला कारणे दाखवा नोटीस बजावली, तिचा एकच गुन्हा झाला ते म्हणजे तीने राहूल गांधी यांची भेट घेतली, असे केसी वेणुगोपाल म्हणाले. तसेच रेल्वेने राजकारण न करता विनेश फोगाटला पदमुक्त करण्यासाठीची औपचारिकता पूर्ण करावी, असा खोचक सल्ला वेणुगोपाल यांनी रेल्वेला दिला आहे.