पेण तालुक्यात 500 रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंतच्या गणेशमूर्ती उपलब्ध असल्याची माहिती हर्षदा कला केंद्र बोरगावचे गणेश मूर्तिकार अविनाश भोईर, गणेशमूर्ती व्यवसायकार कल्याणकारी मंडळाचे माजी खजिनदार नीलेश समेळ यांनी दिली
आखीव रेखीव व सजीव वाटणाऱ्या पेण तालुक्यातील गणेशमूतींना गणेशभक्तांची अधिक पसंती असते. यावर्षी पेण तालुक्यात सुमारे 34 लाख गणेशमूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. या गणेशमूर्तींपैकी 1 लाख 3 हजार 24 गणेशमूर्ती रायगड जिल्ह्यातील घराघरात पुजल्या जाणार आहेत, तर 273 गणेशमूर्तीची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे प्रतिष्ठापना होणार आहे. विशेष म्हणजे पेणमधून अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, थायलंड, इंडोनेशिया, दुबईला सवा लाख मूर्ती रवाना झाल्या आहेत.
पेणच्या गणेशमूर्ती देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. पेण तालुक्यात गणेशमूर्ती निर्मितीचे सुमारे 1600 कारखाने आहेत. पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवा, तांबडशेत, बोरगाव, शिर्की, बोरी, वढाव, अंबेगाव येथील कारखान्यात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती साकारण्यात येतात. देश-विदेशातील मागणी पूर्ण करण्याकरिता पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखान्यात वर्षभर गणेशमूर्ती साकारण्याचे काम सुरू असते. यावर्षी लालबागचा राजा, चिंतामणी, मोरेश्वर, अष्टविनायक, दगडूशेठ हलवाई, टिटवाळा, पेशवाई, शिवरेकर, गरुडावर स्वार बाप्पा, खेकड्यावर स्वार बाप्पा यासह इतर विविध प्रकारच्या गणेशमूर्तीना ग्राहकांनी पसंती दिली आहे. अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, थायलंड, दुबई, इंडोनेशिया, टेक्सास यासह इतर देशातही बाप्पांच्या मूर्तीना मागणी असल्याने यावर्षी सुमारे सवा लाख मूर्ती परदेशात रवाना झाल्या असल्याची माहिती गणेशमूर्ती व्यवसायकार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिली.
260 कोटींचा पतपुरवठा
पेण तालुक्यातील गणेश उद्योगाला राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही मोठा हातभार मिळतो. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकांकडून गणेशमूर्ती कारखानदारांना सुमारे 260 कोटींचा पतपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पेण तालुक्यातील गणेशमूर्ती उद्योगाची उलाढाल सुमारे 370 कोटींची झाली आहे. तसेच शाडू माती, वाहतूक, रंग व कारागिरांचा खर्च वाढल्याने यावर्षी गणेशमूर्तीच्या दरात 20 टक्के वाढ झाली आहे.