शिवरायांच्या पुतळा पुनर्स्थापनेचा दोन दिवसांत निर्णय घ्या, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा ‘अदानी’ला अल्टिमेटम

मुंबई विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या पुनर्स्थापनेला चालढकल करणाऱया मुजोर अदानी व्यवस्थापनाविरुद्ध स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवरायांच्या पुतळय़ाची योग्य ठिकाणी पुनर्स्थापना झालीच पाहिजे. याबाबत अदानी व्यवस्थापनाला दोन दिवसांत निर्णय घेण्यास सांगा, अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी अदानी व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा देत महासंघाने विमानतळ पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे.

मस्तवाल अदानी व्यवस्थापनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना व अवमान करण्यात आला. पण आता त्यांचा मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही. महाराजांच्या पुतळय़ाची योग्य ठिकाणी तेही आम्हाला विश्वासात घेऊन पुनर्स्थापना झाली पाहिजे, असे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने विमानतळ पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विमानतळ परिसरात योग्य ठिकाणी पुनर्स्थापित झालाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे, परंतु मुजोर अदानी व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही गंभीर बाब असून आपण या गंभीर विषयासंदर्भात अदानी व्यवस्थापनाला येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन पुतळय़ाची पुनर्स्थापना आम्हाला विश्वासात घेऊन योग्य ठिकाणी करण्यास सांगावे, अन्यथा जर सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी अदानी व्यवस्थापन म्हणजेच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड जबाबदार असेल, असा सूचनावजा इशारा स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने विमानतळ पोलिसांना देण्यात आला आहे.