सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत गणरायाचे आगमन शनिवारी, 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. शनिवारी दुपारी 1.50 पर्यंत गणेशमूर्ती पूजनाचा मुहूर्त असून याआधी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करावे, असे पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुढच्या वर्षी गणरायाचे आगमन लवकर होणार आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीपेक्षा 10 दिवस बाप्पा लवकर येतील.
7 सप्टेंबर रोजी, श्रीगणेश चतुर्थीला मध्यान्हकाली पार्थिव गणेश पूजन करावयाचे आहे. या दिवशी सकाळी 11.22 पासून दुपारी 1. 50 पर्यंत मध्यान्हकाल आहे. या वेळेत पार्थिव गणेशमूर्ती पूजन करावे. ज्यांना या वेळेत गणेशमूर्ती पूजा करता येणे शक्य नसेल त्यानी प्रातःकालपासून म्हणजेच पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी 1.50 पर्यंत श्रीगणेश पूजन करावे, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
n यावर्षी मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 8.02 वाजेपर्यंत ज्येष्ठा गौरी आणाव्यात. बुधवार 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन करावे आणि गुरुवार 12 सप्टेंबर रोजी रात्री 9.51 पर्यंत ज्येष्ठा गौरी विसर्जन करावे.