अभिनेता शाहरुख खान देशातील सर्वाधिक टॅक्स भरणारा सेलिब्रिटी बनला आहे. त्याने तब्बल 92 कोटी रुपयांचा कर भरला. खेळाडूंमध्ये विराट कोहली 66 कोटी टॅक्स भरून पहिल्या क्रमांकावर आहे.
फॉर्च्युन इंडियाने बुधवारी 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणाऱया हिंदुस्थानी सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. शाहरुख खाननंतर या यादीत तामिळ सुपरस्टार थलपथी विजय आहे. त्याने 80 कोटी रुपयांचा कर जमा केला. यादीत तिसऱया स्थानावर सलमान खान आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानचे काही चित्रपट चालले नसले तरी त्याने 75 कोटी रुपयांचा कर भरला आहे. एक हजार कोटींची कमाई करणाऱया कल्की 2898 चित्रपटाचा भाग असलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनी 71 कोटींचा कर भरून या यादीत ते चौथ्या स्थानावर आहेत.
करिना कपूरने भरला सर्वाधिक टॅक्स
अभिनेत्री करिना कपूर ही भारतातील सर्वाधिक कर भरणारी महिला सेलिब्रिटी आहे. अभिनेत्रीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 20 कोटी रुपयांचा कर भरला. या यादीत ती शाहिद कपूर आणि साऊथ स्टार मोहनलाल यांच्या वर आहे, ज्यांनी 18 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. या यादीत कॉमेडियन कपिल शर्मा 26 कोटींचा कर भरून 11व्या क्रमांकावर आहे.
अक्षय कुमार टॉप-20 मध्येही नाही
यंदा अक्षय कुमारचे नाव फॉर्च्युनच्या टॉप-20 मध्येही नाही. गेल्या वर्षी म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांनी 25 कोटी रुपयांचा कर भरला होता. 2023 मध्ये तो सर्वाधिक टॅक्स भरणारे सेलिब्रिटी देखील होता.