सरसकट पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या अकरा संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर आज तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडेसहा हजारांची वाढ आणि कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊन पुन्हा कामावर घेण्याच्या आश्वासनासह इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यामुळे संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीकडून करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे कोकणात जाण्यासाठी मुंबईत अडकून पडलेल्या 65 हजारांवर कोकणी गणेशभक्तांसाठी कोकणात जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे संप मिटल्याने एसटी कर्मचारी आणि गणेशभक्तांना बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या संपकऱ्यांची दोन दिवस कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आगारातील सर्व गाड्या बंद ठेवण्यात आल्या. यामुळे गावखेड्यात महत्त्वाची वाहतूक सेवा असणारी एसटी ठप्प पडल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक, उपचारासाठी शहरात जाणारे वृद्ध यांच्यासह सर्वच नागरिकांची मोठी कोंडी झाली होती. यातच काही ठिकाणी एसटी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांकडून गाडय़ांची तोडफोड करण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीला सायंकाळी चर्चेसाठी बोलावून मागण्या मान्य केल्या.
आता मुंबई-गोवा मार्गावर कसोटी
एसटीच्या संपामुळे कालपासून मुंबईतून निघणाऱ्या एसटीच्या नियमित गाड्या, जादा गाड्या आणि ग्रुप बुपिंगच्या गाड्या अडकून पडल्या होत्या. मात्र आता संप मिटल्यामुळे शेकडो गाड्या एकाच वेळी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रस्थान करणार आहेत. यातच मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांमुळे आणि शेकडो गाडय़ांमुळे चाकरमान्यांचा हा प्रवास अनेक तासांनी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून या गाडय़ांचे नियोजन कसे केले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईत अडकलेल्या 65 हजार कोकणी गणेशभक्तांचे हाल
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला ‘एसटी’चा संप अखेर बुधवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आला तरी सकाळपासूनच बोजा बांधून कुटुंबकबिल्यासह आगारात दाखल झालेल्या 65 हजार कोकणी गणेशभक्त चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळपासून संपाबाबत सरकारकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नसल्याने मुंबईतील सर्व आगारांत शेकडो गाड्या जागेवरच उभ्या होत्या. संप मिटवण्यासाठी मिंधे सरकारकडून चालढकल केली जात असल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचा संताप गणेशभक्तांमधून व्यक्त होत होता.
अशा रखडल्या गाड्या
बुधवारी रखडलेल्या एसटी
357
गुरुवारी बसेसचे नियोजन
800
शुक्रवारी जाणाऱ्या गाड्या
250
साडेसहा हजारांची वाढ प्रत्यक्षात वाढ दीड ते पाच हजारांची
एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात सरसकट साडेसहा हजारांची वाढ झाल्याचे सरकारने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना 2021च्या निर्णयानुसार दीड ते पाच हजारांचीच वाढ झाली आहे. याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांची पगार वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये 2021ला पाच हजार रुपयांची वाढ झाली होती, त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना 2021मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4 हजारांची वाढ झाली आहे.
कृती समिती म्हणते…
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2020पासून मूळ पगारात सरसकट साडेसहा हजार वाढ झाली आहे. ही वाढ मूळ पगारात झाल्याचे 13 संघटनांच्या कृती समितीकडून सांगण्यात आले.