Pune News – हॉटस्पॉट देण्यास नकार दिला, भररस्त्यात इसमाला भोसकलं

मोबाईल हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याने भररस्त्यात चौघांनी चाकूने भोसकून 47 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. वासुदेव कुलकर्णी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी तिघे जण अल्पवयीन आहेत.

मयत वासुदेव कुलकर्णी हे बँकेत नोकरी करत होते. दररोज रात्री जेवणानंतर कुलकर्णी चालण्यासाठी जायचे. नेहमीप्रमाणे 2 सप्टेंबर रोजी रात्री ते जेवण करून चालण्यास गेले. यावेळी मुख्य आरोपी मयुर भोसले हा तीन अल्पवयीन मुलांसह कुलकर्णी यांच्याजवळ गेला. मयुरने कुलकर्णी यांच्याकडे हॉटस्पॉट मागितला. मात्र कुलकर्णींनी हॉटस्पॉट देण्यास नकार दिला.

हॉटस्पॉटसाठी नकार दिल्याने चौघांनी कुलकर्णी यांच्याशी वाद घातला. यानंतर चौघांनी धारदार हत्याराने कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर वार करून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. आसपासच्या नागरिकांनी हडपसर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत हडपसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.