राहुल द्रविड पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत, IPL मध्ये ‘या’ संघाच्या खेळाडूंना देणार क्रिकेटचे धडे

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे पुन्हा प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. ‘ईएसपीएल क्रिकइन्फो’ने याबाबत वृत्त दिले आहे.

राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि टीम इंडियाने जून महिन्यात टी20 वर्ल्डकप उंचावला. त्यानंतर कार्यकाळ संपल्याने द्रविड यांनी प्रशिक्षकपद सोडले होते. तेव्हापासून ते बेरोजगार होते. यावर त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली होती.

राजस्थान रॉयल्स या फ्रेंचायझीने राहुल द्रविड यांच्यासोबत एक करार केला आहे. आगामी महिन्यात होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी कोणते खेळाडू रिटेन करायचे याबाबत त्यांच्याशी फ्रेंचायझीने चर्चाही सुरू केला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याच्यासोबत राहुल द्रविड अंडर-19 पासून काम करत आलेले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये चांगला ताळमेळही आहे.

राहुल द्रविड यांच्यासाठी राजस्थान रॉयल्स संघ नवीन नाही. आयपीएल 2012 आणि 2013 मध्ये ते या संघाचे कर्णधार होते आणि 2014 आणि 2015 च्या आयपीएल हंगामात राहुल द्रविड यांनी डायरेक्टर आणि मेंटॉर म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर 2016 मध्ये द्रविड हे दिल्ली कॅपिट्स संघाशी जोडले गेले.

2019 मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख पद देण्यात आले आणि 2021 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या दोन फायनल, वन डे वर्ल्डकपची फायनल गाठली. तर जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकला.