मिंधेंचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह 100 जणांवर गुन्हे

द्वारली गाव येथील वादग्रस्त जमिनीची मोजणी सुरू असताना विकासक समर्थक व शेतकऱ्यांत झालेल्या राडाप्रकरणी हिललाईन पोलिसांनी मिंधे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याच वादातून महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आठ महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता.

उल्हासनगर द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीवर विकासकाने समर्थकांच्या उपस्थितीत मोजणी सुरू करताच शेतकरी व विकासक समर्थकात राडा झाला. यावेळी मिंधे गटाचे महेश गायकवाड हेही त्यांच्या साथीदारांसह आले. यावेळी एका संशयित इसमाकडून गावठी कट्टय़ासह चॉपर, चापू  अशी  घातक शस्त्रs पोलिसांनी जप्त केली. या राडाप्रकरणी जितेंद्र रामअवतार पारीख यांच्या तक्रारीवरून महेश गायकवाड यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल केले. तर सविता जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र पारीख यांच्यासह 66 जणांवर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आता महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवरही गुन्हा दाखल केल्याने  मिंधेंच्या गोटात पळापळ सुरू झाली आहे.