सलग दोनदा सांगली विधानसभा निवडणूक जिंकणारे भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीपासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या विजयासाठी प्रयत्न करू, तसेच यापुढे राजकारणापेक्षा समाजकारण करू, असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. गाडगीळ यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वर्षभरापासून आमदार गाडगीळ यांचे समर्थक सांगली विधानसभा निवडणुकीची तयारी करीत होते. अचानक निवडणुकीच्या राजकारणापासून माघार घेत असल्याचे गाडगीळ यांनी आज जाहीर केले. लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. यासाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे. राजकारणात कधीतरी थांबावे लागते, या मताचा मी आहे. मला दोनदा विधानसभेची उमेदवारी मिळाली. आता माझ्याऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे माझे प्रामाणिक मत आहे, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, ‘करुनी अकर्ते होऊनियां गेले, तेणे पंथें चाले तोची धन्य तोची धन्य जनीं पूर्ण समाधानी’ या रामदास स्वामींच्या अभंगाच्या ओळींचा संदर्भ देत गाडगीळ यांनी कारकिर्दीबाबत समाधान व्यक्त केले आहे.