मणिपूर अजूनही हिंसाचाराने धुमसत आहे. येथील हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहेत. या मुद्द्यावर मणिपूरमधील सर्वच राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच भाजपला पक्षातीलच अनेक नेत्यांनी मणिपूरकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. संघानेही या मुद्द्यावरून भाजपचे कान टोचले आहेत. आता भाजपच्या आमदारानेच मणिपूरबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे मणिपूरमधील केंद्रीय सुरक्षा दलांना माघारी बोलवावे, अशी मागणी भआजप आमदार राजकुमार इमो सिंह यांनी केली आहे. मणिूपरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचे राजकुमार जावई आहेत. तसेच ते भाजप आमदरा असल्याने त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवत राजकुमार यांनी ही मागणी केली आहे. केंद्रीय सुरक्षा दल मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यास असमर्थ ठरत आहेत. हिंसाचाराच्या घटनांकडे ते मूक साक्षीदार म्हणून बघत आहेत. त्यामुळे हिंसाचार रोखण्यास असमर्थ ठरलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांना माघारी बोलवावे आणि येथील हिंसचार रोखण्याची जबाबदारी राज्यातील सुरक्षा दलांना देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सुमारे 60 हजार केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. तरीही येथील हिंसाचाराच्या घटना रोखण्यात केंद्राला अपयश आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय सुरक्षा दल राज्याशी आणि येथील जनतेशी सहकार्य करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच येथील प्रांतीय वाद आणि येथील परिस्थिती राज्य सुरक्षा दलांना योग्यप्रकारे माहिती आहे, त्यासाठी येथील हिंसाचार रोखण्याची जबाबदारी राज्यातील सुरक्षा दलांकडे देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने दहशतवादी आणि बंडखोर संघटनांवरील कठोर कारवाई करण्याची मागणीही राजकुमार सिंह यांनी केली आहे.