लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला, बदलापूरमधील महिला पत्रकारावर दंगलीचा खोटा गुन्हा दाखल; फरार आपटे, कोतवाल मात्र मोकाट

दोन चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर राजकीय दबावामुळे पोलिसांनी त्रुटी असलेला एफआयआर दाखल केल्याची चर्चा असतानाच त्यांनी आता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरही घाला घालण्याची तयारी सुरू केली आहे. एकीकडे या प्रकरणामधील पोक्सोतील फरारी आरोपी आदर्श शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे गेल्या आठ दिवसांपासून मोकाट असतानाच पत्रकारांनी निर्भिडपणे वार्तांकन करू नये यासाठी मिंधे भाजप सरकारने पत्रकारांनाच या प्रकरणात गोवण्याची पुरेपूर तयारी केली आहे. बदलापूरमधील जनआंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोंबरे यांना भिवंडी गुन्हे शाखेने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर शाळेतच सफाई कामगाराने केलेला भयंकर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी केलेली टाळाटाळ त्यामुळे बदलापुरात जनप्रक्षोभ उसळला. त्याचे पडसाद उदय कोतवाल तुषार आपटे देशभरात उमटले, संतप्त बदलापूरवासीयांनी शाळेची तोडफोड केली. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल आठ तास रेल रोको आंदोलन केले. पीडित चिमुकलींवरील अत्याचाराविरोधात स्थानिक युट्यूबच्या पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनीही आवाज उठवला. बदलापूरकरांनी केलेल्या शाळेतील वर्गाच्या तोडफोडीपासून ते बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या रेल रोकोपर्यंत सर्व घटना टिपण्यासाठी श्रद्धा ठोंबरे या प्रचंड धावाधाव करत होत्या.

पोक्सोचे आरोपी बदलापूर पोलिसांना 8 दिवसांपासून सापडत का नाहीत?

श्रद्धा यांची धावाधाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्याने पोलिसांनी थेट त्यांच्यावर दगडफेक, तोडफोड आणि दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना भिवंडी गुन्हे शाखा येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. केवळ बातमीसाठी धावाधाव करताना सीसीटीव्हीत दिसल्या म्हणून श्रद्धा ठोंबरे यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेले आणि त्यानंतर फरार झालेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोघांनाही भाजपचा राजकीय आशीर्वाद असल्यानेच त्यांना अटक होत नाही काय, असा संतप्त सवाल बदलापूरकर करत आहेत.

ही तर माझी अब्रुनुकसानीच

आंदोलन सुरू होते तेव्हा मी शाळेतच होते. त्यावेळी माझ्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही होते. बदलापूर पूर्णचे पोलीस निरीक्षक जाधव हेही त्यावेळी माझ्यासमोरच होते. पण दुर्दैवाची बाब अशी पोलीस निरीक्षक जाधव यांनी माझ्याविरोधात फिर्याद दिली. परंतु यासंदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मी माझा पत्रकारितेचा धर्म निभावत असताना माझ्यावर इतकी मोठी कलमे लावली. 384 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मी शाळेवर आणि पोलिसांवर दगडफेक केली असे आरोप लावले. निर्भिडपणे काम करणाऱ्या पत्रकारांना पोलीस टार्गेट करत आहेत का, हाच माझा सवाल आहे. मी चौकशीसाठी हजर राहणार आणि दादही मागणार. एक महिला म्हणून हा माझ्या अब्रुनुकसानीचाच प्रकार आहे.

श्रद्धा ठोंबरे, पत्रकार