पाकिस्तानवर पराभवाची गडद छाया

बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे यजमान पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. हसन महमूद व नाहीद राणा यांच्या तिखट माऱयापुढे त्यांचा दुसरा डाव 46.4 षटकांत केवळ 172 धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरादाखल पाहुण्या बांगलादेशने उर्वरित 7 षटकांच्या खेळात बिनबाद 42 धावसंख्येपर्यंत मजल मारली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा झाकीर हसन 31, तर शादमान इस्लाम 9 धावांवर खेळत होते. उद्या पाचव्या व अखेरच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 143 धावांची गरज असून पाकिस्तानवर पराभवाची गडद छाया निर्माण झाली आहे. पाकिस्ताने 274 धावसंख्या उभारल्यानंतर बांगलादेशला 262 धावांवर रोखून पहिल्या डावात 12 धावांची अल्पशी आघाडी घेतली होती. मात्र पाकिस्तानला दुसऱया डावात मोठी धावसंख्या उभारता न आल्याने ही कसोटी बांगलादेशच्या बाजूने झुकली आहे.