रेल्वे अपघातात पाय गमावला, पण तो खचला नाही; वाचा देशाला दुसरे सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या नितेशचा संघर्ष…

पहिल्यांदाचा पॅरालिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेल्या बॅडमिंटनपटू नितेश कुमारने आपलं नाणं खणखणीत वाजवत पुरुष एकेरीत SL3 प्रकारात इंग्लंडच्या डेनियल बेथेल याचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले. Paris Paralympics 2024 मध्ये देशासाठी दुसरे सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नितेश कुमारला 2009 साली रेल्वे अपघातात डावा पाय गमवावा लागला होता. मात्र अंधारातून वाट निर्माण करत त्याने यशाला गवसणी घातली. वाचा त्याचा संघर्षमयी जीवन प्रवास.

नितेश कुमारला 2009 साली दुर्दैवाने विशाखापट्टनम येथील रेल्वे अपघातात डावा पाय गमवावा लागला. त्यामुळे पुढचे अनेक महिने त्याला अंथरुणाला खिळून रहावे लागले. मात्र खचून न जाता त्याने या वाईट वेळेचा भविष्यातील चांगल्या वेळेसाठी सदुपयोग केला. त्याने या काळात Indian Institute of Technology (IIT) च्या प्रवेश परिक्षांचा अभ्यास सुरू केला. अभ्यास करण्यासाठी त्याने एक वर्षांची सुट्टी घेतली आणि 2013 साली IIT मंडीमध्ये त्याचा प्रवेश झाला. खऱ्या अर्थाने हा नितेशच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही.

आयआयटी मधील संस्थेत काम करत असताना त्याच्यात बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्याने आपल्या खेळावर काम करायला सुरुवात केली आणि नियमीत सराव सुरू ठेवला. 2016 साली हरियाणा संघातून पॅरा बॅडमिंटनपटू म्हणून त्याने नॅशनल चॅम्पिअनशीपमध्ये भाग घेतला होता. या दिवसापासून नितेश कुमारच्या पॅरा बॅडमिंटन करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर नितेशने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 2017 साली त्याने Irish Para-Badminton International मध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर त्याने अनेक पदकांची लयलूट केली. ज्यामध्ये BWF आणि Asian para games चा सुद्धा समावेश आहे. मागील वर्षी हांग्जो येथे झालेल्या आशियायी स्पर्धेत त्याने तीन पदके जिंकली आणि पॅरिस पॅरालिम्पिकचे दार त्याच्यासाठी उघडे झाले.

para asian games 2023 मध्ये नितेशने आपला दमदार खेळ दाखवत पुरुष दुहेरीत एक सुवर्ण, एकेरीत रौप्य आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते. नितेश कुमार एक चांगला पॅरा-बॅडटिंनपटू तर आहेच, पण त्याचबरोबर तो हरियाणामध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार विभागासाठी वरिष्ठ बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणूनही आपली जबाबदारी पार पाडत आहे. अनेक खेळाडू त्याच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहेत.